दुखणे आरक्षणाचे – जिल्हा परिषद गटांची नवी रचना रद्द ; जुनी रचना कायम ? : काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने निघणार आरक्षण ?

इच्छुक उमेदवारांचे धाबे दणानले ; काहींना फुटले धुमारे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३

राज्यातील शिंदे सरकारने राज्यातील जिल्हा परिषदांची गटरचना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत वाढलेले गट कमी करून पूर्वीच्या जुन्या गटांची रचना कायम करण्यात येणार आहे. परिणामी मागील आठवड्यात काढलेले आरक्षण मातीमोल ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने आरक्षण काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागेल. अनेक गटांमध्ये सध्या निघालेले आरक्षण बदलून अन्य आरक्षण येण्याचा धोका वाढल्याने इच्छुकांचे धाबे दणानले आहे. पंचायत समित्यांच्या आरक्षण आणि रचनेवर कोणताही परिणाम होणार नसल्याने संबंधित इच्छुकांनी सुस्कारा सोडला आहे. दरम्यान आरक्षणाचे भिजत घोंगडे गत आठवड्यात निकाली निघाल्याने कामाला लागलेल्या इच्छुक उमेदवारांच्या कामांना चांगलाच फटका बसल्याने संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामुळे निवडणुका आणखी काही महिने पुढे ढकलल्या जातील.

वाढलेल्या जिल्हा परिषद गटांमध्ये तयारी केलेल्या इच्छुक उमेदवारांना आता अन्य पर्याय शोधावा लागणार असून आरक्षणामुळे गोची झालेल्या इच्छुक उमेदवारांना आरक्षण बदलणार असल्याने धुमारे फुटले आहेत. इगतपुरी तालुक्यातील 5 गटांतील उमेदवारांना बदलणाऱ्या आरक्षणाची प्रतीक्षा आहे. पंचायत समितीचे आरक्षण आणि रचना बदलणार नसल्याने संबंधित इच्छुक खुश आहेत. दरम्यान निवडणुकांचा चांगलाच खेळखंडोबा होत असून जनतेला वेठीस धरले जात आहे. लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची विकासकामे ठप्प झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!