भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी असून ह्या मातीमध्ये उच्च ध्येय साध्य करणारे यशवंत विद्यार्थी लपलेले आहेत. ह्या विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा विकास करतांना ध्येयवादी तरुणांमधून उच्च अधिकाऱ्यांची निर्मिती करण्यासाठी मोडाळे येथील सुसज्ज अभ्यासिका पॅटर्न मोलाचा आहे असे कौतुक छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी स्पर्धा परीक्षांसाठी दुर्गम भागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना बहुमोल ठरणारी सुसज्ज अभ्यासिका उभी केली आहे. छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार ह्या नात्याने ह्या कार्याचा मला अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी केलेल्या विकासाचे कौतुक केले. यासह रोटरी क्लबचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्याही कामाचे कौतुक केले. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, मोडाळे गावात झालेला विकास अभूतपूर्व असून आमदार म्हणून ह्या गावाच्या नेहमीच सोबत आहे. धनंजय बेळे यांनी मोडाळे गावासाठी वीज प्रकल्प आणि अन्य उपयुक्त योजनांची घोषणा केली.
ह्या अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्याला साक्षात छत्रपती आल्याने माझ्यासह गावाला आनंद झाला आहे. झालेल्या कामातून आगामी काळात इगतपुरी तालुक्यातील यशस्वी विद्यार्थी मोठे अधिकारी झाल्याचे मला पाहायचे असल्याचे गोरख बोडके यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, मराठा क्रांती मोर्चाचे नेते करण गायकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, संचालक सुनील जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर, बहिरु मुळाणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, प्रशांत कडू, काँग्रेस नेते रामदास धांडे, गणपत जाधव, विनोद नाठे, तुषार जगताप, सागर वैद्य, प्रमोद जाधव, अनिल भोपे, मदन कडू, तुकाराम वारघडे, आगरी सेना तालुकाध्यक्ष नारायण वळकंदे, अरूण पोरजे, सरपंच मंगला बोंबले, उपसरपंच सिताबाई शेंडगे, राहुल बोंबले, गजीराम शेंडगे, अनिल गोऱ्हे, कृष्णा बोडके, विठ्ठल जगताप, ज्ञानेश्वर झोले, संजय धात्रक, संतोष बोडके, कचरू बागुल, ग्रामसेवक नाना खांडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच हरीश चव्हाण, पत्रकार भास्कर सोनवणे यांनी केले. राष्ट्रवादीचे नेते उमेश खातळे यांनी आभार मानले.
इगतपुरी तालुक्यातून उच्च क्षेत्रातील गुणवंत अधिकाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी कंबर कसली आहे. MPSC आणि UPSC मध्ये अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात गगनभरारी घ्यावी यासाठीही गोरख बोडके यांनी संकल्प केलेला आहे. यासाठी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ह्या गावात २ मजली सुसज्ज अभ्यासिका आज लोकार्पण करण्यात आली आहे. राज्याच्या विविध क्षेत्रातील निवृत्त अधिकाऱ्यांचे मौलिक मार्गदर्शन सुद्धा अभ्यासिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिले जाणार आहे. अधिकारी बनण्यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरणाऱ्या गोरख बोडके यांचे इगतपुरी तालुक्यातून कौतुक केले जात आहे.