इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
घोटी येथील जनता विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा संपन्न झाला. शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. संगीत शिक्षक श्री. तांबे आणि सहकाऱ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय केली. अध्यक्षस्थानी अशोक काळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ए. एस. पाटील यांनी केले. त्यांनी मागच्या दोन वर्षांचा आढावा घेऊन अनेक विषयांवर प्रबोधन करून उपयुक्त सूचना केल्या. शालेय समिती अध्यक्ष भाऊराव पाटील, घोटीचे सरपंच गणेश गोडे, शालेय समिती सदस्य संजय जाधव, दिलीप जाधव, गिरीश मेदने, धर्मा आव्हाड, भरत आरोटे, उपमुख्याध्यपिका एन. पी. बागुल, पर्यवेक्षक बी. ई. कलकत्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. के. जाधव यांनी केले.
यावेळी पालकांनी लक्षणीय हजेरी लावत आपले प्रश्न व अडचणी सर्वांसमोर मांडल्या. शिक्षक व पालकांमध्ये विविध प्रश्नांवर साधक बाधक चर्चा होऊन विविध निर्णय घेण्यात आले. प्रतिष्ठित पालक विलास बोराडे ( शिवसेना सोशल मीडिया प्रमुख ) यांनी पालकांचे प्रतिनिधित्व करून आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक अतुल मोरे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका एस. एन. अहिरे यांनी मुलींच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत माता पालकांचे मुलींच्या विविध समस्यांबद्दल समुपदेशन केले. यावेळी इयत्ता १० व १२ वी मध्ये पहिल्या पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. पर्यवेक्षक बी. ई. कलकत्ते यांनी आभार मानले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.