इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित झाल्याने लोकांच्या सेवेसाठी ह्या गटातून उमेदवारी करणार आहे. या माध्यमातून गटासह इगतपुरी तालुक्यातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध राहील. माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा जनसेवेसाठी करण्यासाठी मी वाडीवऱ्हे गटातून उमेदवारी करणार असल्याची माहिती डॉ. संजय दामू जाधव यांनी दिली. सालगाडी कुटुंबातून अनेक समस्यांचा सामना करीत करीत उच्चशिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दबदबा निर्माण केलेला आहे. धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात अस्थीव्यंगोपचार विभागात प्राध्यापक म्हणून ते 7 वर्षांपासून कार्यरत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा मोठा जनसंपर्क असून लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. यापूर्वी वाडीवऱ्हे आणि नांदगाव बुद्रुक गणातून त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. त्यानिमित्ताने वाडीवऱ्हे गटातील नागरिकांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. प्रत्येक गाव आणि वाड्यावस्त्यांवरील प्रश्नांशी त्यांची ओळख आहे. यामुळे वाडीवऱ्हे गटातून उमेदवारी करून जनसेवा करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे डॉ. संजय दामू जाधव यांनी सांगितले.
ते आपली भूमिका सांगतांना म्हणाले की, नाशिक जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी तालुक्यातील सर्वसाधारण जागांवरून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकप्रतिनिधी निवडुन येऊन त्यांचे बहुमत असणार आहे. वाडीवऱ्हे गटातून निवडून आल्यावर जिल्हा परिषदेत समाजसेवेसाठी अनुसूचित जाती जमातीच्या एकजुटीसाठी प्रयत्न करणार आहे. गोरगरीब आणि आदिवासींचे शिक्षण, आरोग्य व शेती पुरक उद्योग उभारणीसाठी निवडणूक लढवत आहे. इगतपुरी सारख्या आदिवासी तालुक्यातील जनतेच्या जमीनी अधिग्रहित करणे बंद करावे. जमीनी अधिग्रहित करण्यात आल्यास संबंधित कुटुंबांना मासिक उत्पन्नाची सोय करावी. शेती (अधिग्रहित करण्यात)गेलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसाय प्रशिक्षण वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालय यात आरक्षित जागा ठेवण्यात याव्यात. त्यांचे शिक्षण मोफत करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आरोग्य विमा किमान दहा लाखापर्यंत मोफत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. डॉ. संजय दामू जाधव यांनी एमबीबीएस, एमएस, एमबीए, एमसीजे, एमए एलएलबी असे उच्चशिक्षण घेतलेले असून त्यांच्या माध्यमातून चांगला उमेदवार गटाला लाभणार आहे.