लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
‘पहिली बेटी-धनाची पेटी’ हे ब्रीदवाक्य घरोघरी ऐकायला मिळत आहे. वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच ही बुरसटलेली मानसिकता मागे टाकत आता घरोघरी मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागले आहे. इगतपुरी तालुक्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण वाढल्याची शुभवार्ता आहे. १ हजार मुलांमागे ९५० मुली हा जन्मदर समाजस्वास्थाच्या व वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. सोनोग्राफीमधे लिंगपरीक्षण बंदी, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी तसेच सामाजिक जनजागृती ह्यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाल्याचे निरीक्षण सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. इगतपुरी तालुक्यातील मुलींचा जन्मदर वर्षभरात १२ हजार १६२ तर मुलांचा जन्मदर १३ हजार १६२ इतका झाला असल्याची माहिती इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांनी दिली.
जुन्या विचारसरणीत नकोशा झालेल्या मुलींची गर्भातच हत्या होत होती. परंतु आजच्या बदलत्या काळात माता जिजाऊंची प्रतिमा मुलींमध्ये पाहत मुलींच्या जन्माचे स्वागत आणि संगोपणावर भर दिला जात आहे. मुलींचे शिक्षण तसेच आरोग्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्या उज्वल भविष्याकरिता ‘सुकन्या समृद्धी’ सारख्या अनेक योजनांमध्ये तरतूद करत आजचे सुज्ञ पालक विशेष जागरूक झाले आहेत. आजच्या मुलीदेखील उच्चशिक्षित होऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत पालकांचे, समाजाचे आणि देशाचे नाव उंचावत आहेत. परिणामतः लिंगगुणोत्तरासह मुलींमधील शिक्षणाचे प्रमाणही वाढले असल्याचे शुभवर्तमान आहे. १५ ते २२ या वयोगटातील अनेक मुलींनी शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तालुक्यात एकुण मुलींची संख्या १८०४५ असून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलींची संख्या १७९३७ असल्याची सुवार्ता इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी दिली. तालुक्यात अनेक भागांमध्ये मुलींच्या जन्माचे स्वागत होऊ लागल्याने मुलगी ‘नकोशी’ या विचाराला इगतपुरीकरांनी मूठमाती दिली आहे.
सामाजिक प्रबोधनातून स्री-भृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलां इतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने आमचे काम सुरू आहे. धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या तीन महिन्याचा जन्मदर मुले 62 मुली 56 असा जन्मदर आहे..सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अंतर्गत मुलींचे स्वावलंबन, पोषणाबाबतची जनजागृती, चांगल्या आरोग्य सुविधा यामुळेही मुलींच्या जन्मदर वाढीस चालना मिळत आहे.
- संदीप वेढे, वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र धामणगाव
केंद्र शासनाने “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजना सुरू केली आहे. याच धर्तीवर मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणि मुलांइतकाच मुलींचादेखील जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे महत्वाचे आहे. सूज्ञ पालक सकारात्मक पाऊले उचलताना दिसत आहेत. ही बदलती मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी आम्हीही आमच्या परीने पूर्ण प्रयत्नांसह कटिबध्द आहोत. मुलगा-मुलगी एकसमान यातून शिक्षणाचे महत्त्व पटल्याने पालकांमध्ये जनजागृती होताना दिसून येत आहे.
- विद्या पाटील, राज्य आदर्श शिक्षिका