गोरख बोडके यांच्या सेवाकार्याचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक काम करावे – प्रताप दिघावकर : मानवधन पुरस्काराने गोरख बोडके सन्मानित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

मानवधर्म जपण्यासाठी सातत्याने निरपेक्ष सेवाकार्याचा दरवळ पसरवण्यासाठी अनेकजण प्रवाहात उतरत असतात. अशा
व्यक्तिमत्वांकडून कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता निव्वळ सामाजिक सेवेचे महत्वपूर्ण कार्य अखंड सुरु असते. इगतपुरी तालुक्यातील विविध सेवा क्षेत्रात अग्रगण्य असणारे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांचेही कार्य जनतेच्या हृदयात महत्वाचे स्थान राखून आहे. असे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गोरख बोडके यांना नाशिकच्या मानवधन सामाजिक संस्थेने “मानवधन” पुरस्काराने सन्मानित केले आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या विविधांगी सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकसेवा आयोगाचे सदस्य तथा माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव चव्हाण साहेब, प्रकाश कोल्हे यांच्या हस्ते मानवधन पुरस्कार देण्यात आला. हा सन्मान सोहळा नाशिकच्या परशुराम नाट्यगृहात संपन्न झाला.

लोकसेवा आयोगाचे सदस्य तथा माजी पोलीस अधिकारी प्रताप दिघावकर म्हणाले की, जनतेच्या मनात वर्षानुवर्षे अधिराज्य गाजवणे ही अतिशय दुर्मिळ आणि अभूतपूर्व बाब आहे. विविध संकटाच्या काळात आणि अखंडितपणे जनसेवा करणे सामान्य अजिबात नाही. गोरख बोडके यांचे सेवाकार्य अतिशय जवळून पाहिले असल्याने गोरख बोडके सन्मानाला पात्र ठरतात. लोकप्रतिनिधी म्हणून लोकांपासून दूर पळून आणि क्षमता असतांही दीड दमडीही सामाजिक कार्यात खर्च न करणाऱ्या लोकांनी गोरख बोडके यांचा आदर्श घ्यावा असे ते शेवटी म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी गोरख बोडके यांच्या कार्याचे कौतुक केले. मानवधन पुरस्काराने चांगले काम उभे करण्यासाठी मला ऊर्जा मिळाली असून ज्या मान्यवरांनी माझ्या छोट्या कार्याचे कौतुक केले त्यांचा मी ऋणी आहे अशी कृतज्ञता गोरख बोडके यांनी व्यक्त केली. इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी श्री. बोडके यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!