
इगतपुरीनामा न्यूज – आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात इच्छुकांनी आतापासूनच मतदार संघामध्ये दौरे सुरू केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे केलेली दिसत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार शिवराम झोले यांचे ज्येष्ठ चिरंजीव बाळासाहेब झोले यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांनी खंबाळे येथे झालेल्या बैठकीत ही मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे उपस्थित होते. या बैठकीमध्ये तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. इगतपुरी विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीव असून या मतदारसंघांमध्ये माजी आमदार शिवराम झोले यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहेत. त्यांचा वारसा म्हणून आज बाळासाहेब झोले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असून त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. नवा युवा चेहरा म्हणून बाळासाहेब झोले यांची ओळख असून तरुणांचा त्यांना वाढत्या प्रमाणात प्रतिसाद आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली तर नक्कीच विजयी होतील असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला आहे. यावेळी बाळासाहेब झोले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मला पक्षाने संधी दिली तर मतदारसंघातील विविध प्रश्न, समस्या असतील त्या तातडीने सोडवील. तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असेल तो मी निश्चितपणे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल.