इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ – सर्वांसाठी तत्परतेने मदतीला धावून जाणारे मुख्याध्यापक हरी आव्हाड हे विद्यार्थीप्रिय व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी शाळेला घर मानून स्वतःला शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात वाहून घेतले. प्रभावी काम करून विद्यार्थ्यांमध्ये यशाची बीजे पेरली असून त्यांचा हेवा व अभिमान वाटतो. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आयुष्य घडविण्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन खेड शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक नवनाथ सानप यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील शेणवड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक हरी आव्हाड २८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यावेळी सेवापूर्ती सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
शेणवडच्या सरपंच ज्योती ढगे, माजी सरपंच बापू वारघडे, सुरेश ढगे, एम. व्ही. फुंदे, तन्वीर जहागिरदार, जे. एन. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी भावुक झाले. नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व असणाऱ्या आव्हाड सरांचा शासकीय सेवेचा प्रवास अतिशय वाखाणण्याजोगा आहे. अपंगत्वार मात करीत अनेक विद्यार्थ्यांना शिस्त लावणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहे. त्यांच्या सहवासात आमचे सोने झाले. त्यांचे शाळेच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. हे त्यांच्या कार्यपद्धतीचे यश असल्याचे शिक्षक अनिल वाघ म्हणाले. याप्रसंगी आर. बी. जाधव, एस. आर. वाघ, एस. के. पवार, एस. ई. पगारे, श्रीमती वाळके, आय. एस. पवार, एच. डी. सोनवणे, ए. पी. पुरी, जया बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.