इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
घोटी येथील प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी सालाबादप्रमाणे त्रिंगलवाडी किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. आज पहाटे इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध शिवकालीन त्रिंगलवाडी किल्ल्यावर चढाई करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत असलेल्या राहुल हांडे या युवकाची किल्ल्यावर मिरवणूक काढून शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी युवकांनी मावळ्यांचा वेष परिधान केला होता. मुलींनी पारंपरिक तलवारबाजी, दांडपट्टा खेळून शिवराज्याभिषेकाची शोभा वाढवली. या कार्यक्रमानी ऐतिहासिक शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेणीनुसार हा किल्ला १० व्या शतकात बांधला असावा. १६३६ मध्ये शहाजीराजेंचा मुघलांकडून पराभव झाल्यानंतर हा किल्ला शहाजीराजेंनी मुघलांच्या ताब्यात दिला. मराठयांनी हा किल्ला कधी ताब्यात घेतला हे माहीत नाही. परंतु १६८८ मध्ये हा किल्ला मराठयांकडून मोगलांनी जिंकला. अशी ऐतिहासिक माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी दिली. हा अविस्मरणीय शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, बाळासाहेब आरोटे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, राहुल हांडे, महेंद्र आडोळे, गोकुळ चव्हाण, सुरेश चव्हाण, संतोष म्हसणे, सोमनाथ भगत, निलेश बोराडे, साहेबराव आंबापुरे, रमेश हेमके, संजयमंत्री जाधव, पांडुरंग भोर, नितीन भागवत, आदेश भगत, उमेश दिवाकर, संकेत आडोळे, शिवा आडोळे, प्रथमेश नवले, कु. साक्षी आरोटे, साक्षी आडोळे आदी सहभागी झाले होते.