रस्ते सुरक्षा कृती समितीच्या मागण्यांची दखल घेऊन अनेक कामांना मिळणार गती ; मागण्या पूर्ण न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा
इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
मुंबई आग्रा महामार्गावर वाढत असलेल्या अपघातांची संख्या चिंताजनक ठरत आहे. ह्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षा कृती समिती, नाशिक स्थापन झाली आहे. आज ह्या समितीतर्फे राष्ट्रीय महामार्ग विभागाला रस्ते अपघात थोपवण्यासाठी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नाशिक ते इगतपुरी दरम्यान होणाऱ्या रस्ते अपघाताविषयी व सुरक्षित उपाय योजना करण्याविषयी अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी निवेदन देवून विविध मागण्या करण्यात आल्या. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, व्हीटीसी फाटा येथे अपघात टाळण्यासाठी योग्य रुंदीचा vehicular underpass देण्याची गरज आहे. व्हीटीसी फाटा येथे म्हणजे घोटी-शिर्डी रस्त्यावरून ( बेलगाव कुर्हेकडून ) क्रॉस रोड येत असलेल्या जंक्शनवर हे स्थान वळणावर आहे. रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकामध्ये उघडलेले आहे. जंक्शन ओलांडून बरीच वाहतूक सुरू असते. राष्ट्रीय महामार्गाचा वापरकर्ता १०० किमी प्रति तासापेक्षा जास्त वेगाने ह्या ठिकाणी गाडी चालवत असतो. एकूणच ही जागा अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे दिसून आले आहे.
■ गोंदे दुमाला फाटा येथे Undepass प्रस्तावित करणे. गोंदे दुमाला फाटा हे वर्दळीचे ठिकाण असून रस्ता ओलांडताना अपघात होत असतात. सदर ठिकाणी विविध कंपन्या असल्याने जड वाहतूक मोठ्या प्रमाणात ये जा करत असते. यासह हजारो कामगार प्रवास करून अनेकजण रस्ता ओलांडत असतात. दोन ठिकाणी पादचारी पुलाची सुद्धा आवश्यकता आहे.
■ वाडीवऱ्हे जंक्शन येथे योग्य वाहतूक व्यवस्था करा आणि उजवीकडे वळणारी वाहतूक अंडरपासमधून वळवण्यात यावी. वाडीवऱ्हे जंक्शन येथे underpass चा वापर केला जात नाही. गावातून येणारी वाहतूक थेट महामार्गावर अनियंत्रितपणे घुसत आहे. नाशिककडून वाडीवऱ्हे गावात वळणारी आणि वाडीवऱ्हे गावातून घोटीकडे वळणारी वाहतूक ही धोका पत्करून वळत असल्याने जास्त अपघात होतात.
■ रायगडनगर येथील Median Opening बंद करावी. रायगडनगर येथे तीव्र उभ्या वळणावर median opening आहे. अशा प्रकारची तरतूद जी वाहतूक आणि यू टर्निंगसाठी अत्यंत धोक्याची आहे.
■ वाडीवऱ्हे आणि रायगडनगर दरम्यान cattle underpass द्यावा. वाडीवऱ्हे आणि रायगडनगर दरम्यान गुरे जनावरे अनेकदा सकाळी आणि संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग ओलांडतात. ह्या लांबी दरम्यान वाहतुकीचा वेगही जास्त असतो. ह्याच कारणाने येथे बरेच अपघात झालेले आहेत.
■ लोखंडी anti-crash barrier बसवणे.जागेवर बांधलेले दोरीचे संरक्षण ( wire Rope ) तांत्रिकदृष्ट्या अपुरे आणि वाहतुकीसाठी धोक्याचे आहेत. अनियंत्रित झालेली गाडी दुसर्या बाजूच्या रस्त्यावर जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. असे अनेक अपघात झालेले देखील आहेत.
■ मुंढेगाव फाटा येथे Underpass प्रस्तावित करणे. मुंढेगाव फाट्यावरून पंचक्रोशीतली सगळी वाहतूक घोटी आणि इगतपुरी इथे जात असते. ह्या फाट्याच्या दोन्ही बाजूने सरळ रस्ता असल्याने महामार्गाची वाहतूक जास्त वेगात धावत असते. मुंढेगाववरून नाशिककडे वळणारी व घोटीकडून येऊन मुंढेगावकडे वळणारी वाहतूक धोका पत्करून वळत असते। अशा परिस्थितीत थोड्याशा अनावधानाने गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.
■ गोंदे ते वाडीवऱ्हे service road प्रस्तावित करावा. गोंदे व वाडीवऱ्हे येथे MIDCअसून आजूबाजूच्या परिसरातील बहुतेक नागरिक ह्या भागात वावरत असताना त्यांना महामार्ग वापरावा लागतो. महामार्गावरील अति गतीच्या वाहतुकीमुळे स्थानिक वाहनाची अपघाताची संख्या वाढत आहे.
■ मुकणे फाटा येथील underpass दुरूस्त करावा. मुकणे फाटा येथे underpass दिलेला असून बऱ्याच वेळा त्यात पाणी साठलेले असल्याने वाहतुकीस अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे वाहतूक नाइलाजाने underpass टाळून करावी लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. पावसाळ्यात तेथे पाणी निचरा होण्याची सोय तातडीने करावीत. महामार्गावर योग्य त्या ठिकाणी पथदीप बसवावेत.
यावेळी झालेल्या बैठकीत महामार्ग संचालक श्री. साळुंखे यांनी सहकार्य करीत तात्काळ करण्याच्या काही उपाययोजना येत्या दोन ते तीन दिवसात संबंधित जागांवर करण्यासाठी सहमती दर्शवली. यामध्ये गोंदे दुमाला फाटा व व्हिटीसी फाटा येथील पादचारी पुलाचा प्रस्ताव लवकरच मंजूर करून करण्यात येणार आहे. तात्काळ उपाययोजना म्हणून व्हिटीसी फाटा, गोंदे दुमाला फाटा, मुंढेगाव फाटा येथे महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी आडवे पट्टे मारले जाणार आहेत. मुकणे येथील UNDERPASS चे पावसाळी दुरुस्ती काम तत्काळ हाती घेणार आहेत. पावसाळ्यात पाणी निचरा करण्यासाठी PUMP ची व्यवस्था असणार आहे. उर्वरित मागण्या ज्याला प्रशासकीय विलंब लागणार आहे त्याच्या मंजुरीसाठी वेगाने प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी विविध सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी “रस्ते सुरक्षा कृती समिती” मध्ये सक्रीय सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे मुख्य निमंत्रक व रस्ते सुरक्षा विषयाचे तज्ञ भाई संदीप पागेरे यांनी केले. याप्रसंगी हिंदवी स्वराज्य फाउंडेशनचे संस्थापक डॉ. रुपेश नाठे, मनसे नेते आत्माराम मते, गणेश मुसळे, सिस्डी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सीमा दिवटे आदींसह विविध नागरिक उपस्थित होते. रस्ते सुरक्षा कृती समितीमध्ये लक्षमण गोवर्धने, तुकाराम सहाणे, तुकाराम वारघडे, गोकुळ धोंगडे, इगतपुरीनामाचे मुख्य संपादक भास्कर सोनवणे, पत्रकार विक्रम पासलकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालुंजकर, अरुण भोर, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, मनोज सहाणे यांची आमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली.