लेखन : भास्कर सोनवणे, मुख्य संपादक इगतपुरीनामा
ग्रामीण लोकजीवनात वर्षानुवर्षे अनेक दाहक प्रश्नाशी झुंजणारी अनेक माणसं आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ज्वलंत परिणामांचा अनुभव असणारेही अनेक आहेत. मात्र आयुष्यभर लढा देऊन ह्या प्रश्नांवर उत्तरं शोधणारी व्यक्तिमत्व दुर्मिळ आहेत. याचप्रकारे आयुष्याची ८० वर्ष अनेकानेक आघाड्यांवर लढा देऊन यशाचे सुखद स्वप्न ज्यांनी प्रत्यक्षात साकार केले ते विश्राम भाऊराव महाले हे व्यक्तिमत्व आहे. भाकरीचा अर्धा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झालेल्या अतिशय सामान्य कुटुंबातील त्यांचा जीवनप्रवास यशाच्या शिखराकडे पोहोचला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली सारख्या लहानश्या खेड्यातील ही ८० वर्षीय तरुण व्यक्ती गावाच्या सोसायटीच्या चेअरमनपदी विराजमान झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या यशाचा “विश्राम” अभिनंदनास पात्र ठरतो.
विश्राम भाऊराव महाले यांना मागील अनेक पिढ्यांपासून गरिबीचे चटके सोसत असतांना शेतकऱ्यांवरील समस्यांचा वर्षाव अस्वस्थ करत होता. याच गरिबीमुळे स्वतःच्या कुटुंबाच्या वीतभर पोटासाठी काळ्या मातीत राब राब राबणे त्यांना क्रमप्राप्त होते. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी विविध स्वप्न पाहतांना ह्या स्वप्नांची राखरांगोळी करण्याचे काम येणारे तुटपुंजे उत्पन्न करत होते. यामुळे उद्याचा दिवस तरी चांगला येईल अशा आशेने आयुष्याची अनेक वर्षे मागे पडत गेली. आपली आशाआकांक्षा पूर्ण व्हावी यासाठी शिक्षणाचा वसा घ्यावा आणि पुढची पिढी तरी माझे सर्व स्वप्न निश्चित पूर्ण करेल असा दृढविश्वास मनात पक्का होता. त्यानुसार आर्थिक दैन्यावस्था असतांनाही मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी कसलेली कंबर यशस्वी ठरली. सुसंस्कृत, सुसंस्कार आणि सुसंवाद या त्रिसूत्रीने अनेकांना त्यांनी दिली शिकवण उपयुक्त ठरली. सर्व कुटुंब एकदा स्थिरस्थावर केलं की मग सामाजिक विषयावर उत्तरं शोधणारे काम त्यांनी सुरू केले. मुलांच्या आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांसाठी चांगले काम उभे करण्यासाठी त्यांच्या मनात सुरू असलेले द्वंद्व पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागले.
वाढोली सोसायटी म्हणजे शेतकऱ्यांचा आत्मा असणारी सहकारी संस्था..ह्या संस्थेद्वारे अडल्या नडलेल्या सामान्य शेतकऱ्याला न्याय देता येऊ शकतो हे त्यांनी जाणले. सोसायटीची निवडणूक लागल्यानंतर शेतकरी हितासाठी झटणारे लोक त्यांनी शोधायला आरंभ केला. सत्ता मिळवण्यासाठी अनेक उपदव्याप करणारी व्यक्तींचा यामुळे रोष वाढला. कोणाचीही पर्वा न करता विश्राम महाले यांनी आपलं काम नेटाने सुरू ठेवलं. ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांनी अनेक प्रकारे अडचणी उभ्या केल्या. ह्या सर्वांवर मात करून त्यांनी १२ जागा लढवल्या. अनेक वर्ष सोसायटीचे राजकारण करणारे आणि त्यांच्या समर्थकांनी ह्या १२ जणांचा दणक्यात पराभव होईल अशी वातावरणनिर्मिती केली. त्यासाठी नाना संकटे उभी करून पैशांचा वापर केला. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत विश्राम महाले यांच्यासह सर्व १२ उमेदवार निश्चितपणे पराभूत होतील अशी चर्चा सर्वत्र पसरली. मात्र हा ८० वर्षाचा भक्कम आणि दणगट तरुण डगमगला नाही. १२ संचालक निवडून येऊन आपणच सत्ता स्थापन करू असा विजयी विश्वास त्यांनी सर्वांना दिला. अखेर मतमोजणीच्या दिवशी त्यांच्या विश्वासाला पक्के करणारी घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यात पसरली. विश्राम महाले यांच्यासह १२ जणांनी प्रस्थापित सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव केला. यामुळे विश्राम महाले यांच्या स्थितप्रज्ञ स्वभावाचा अनुभव सर्वांना आला. त्यांच्या नियोजन कौशल्यातून उभे केलेल्या पॅनलने सोसायटीमध्ये मिळवलेला विजय नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक दखलपात्र ठरतो. मुलगा पत्रकार ज्ञानेश्वर महाले याने ह्या निवडणुकीत आपलं कुशल नियोजन प्रत्यक्ष साकार केलं. वडिलांना चेअरमनपदावर बसवण्याचे ज्ञानेश्वरचे आनंददायी स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झालं.
आयुष्यभर निव्वळ संकटांचा सामना, गरिबीशी दोन हात करणारे विश्राम भाऊराव महाले हे वाढोली सोसायटीच्या चेअरमन पदावर दिमाखात विराजमान झाले आहेत. मंजिले उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, पंख होनेसे कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उंची उड़ान होती है । याप्रमाणे विश्राम महाले यांनी वयाच्या ८० व्या वर्षी आपले स्वप्न पूर्ण करून उंच उड्डाण केले आहे. त्यांचे आजोबा कै. दादा भाऊ महाले, वडील कै. भाऊराव दादा महाले, बंधू यशवंत, प्रभाकर, कै. रामभाऊ महाले यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्यांनी मिळवलेले यश निर्विवाद आहे. म्हणूनच संजय, नंदु आणि ज्ञानेश्वर महाले, ९ पुतणे, नातवंडे या सर्वांच्या अभूतपूर्व आनंदाचा आजचा हा दिवस आहे. कितीही संकटे आली तरी त्या संकटांच्या ढिगाऱ्यावर उभे राहून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विश्राम भाऊराव महाले यांचे मनापासून अभिनंदन..