भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
आदिवासी भागामध्ये वारली पेंटींग होळी, नागपंचमी, भिंतीवर लग्नचौक, देवचौक अशा विविध लग्न समारंभ ठिकाणी रेखाटले जाते. त्यामध्ये शेती, लावणी, नागरणी, पाणवठा, गणशोत्सव, होळी, झाडे, प्राणी, डोंगर नदी व ग्रामीण जीवनातील रोजच्या जीवनातील दैनदिन कामकाज असे विविध विषय असतात. असे अनोखे विषय घेऊन वारली चित्रकला जोपासली जात आहे. ही अनोखी चित्रकला रेखाटणारे इगतपुरी येथील शिक्षक शशिकांत खांडवी अनोखे चित्र लोकांसमोर आणण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या वारली चित्रकलेचा छंद गेल्या १५ वर्षापासुन सातत्याने सुरु आहे. वारली चित्रशैली लोकांपर्यंत व घराघरात पोहचवण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपक्रम म्हणुन १४ वर्षापासुन शिकवत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी शालेय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेले आहेत. शशिकांत खांडवी यांच्या वारली चित्रकलेची दखल विविध क्षेत्रातून घेतली जात असून त्यांना विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.
शशिकांत खांडवी इगतपुरी येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या महात्मा गांधी हायस्कुलमध्ये शिक्षक आहेत. त्यांना यापूर्वी पद्यश्री जिव्हा सोमा म्हसे यांच्या स्मरणार्थ ऑन द स्पॉट वारली चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम बक्षीस मिळाले आहे. यासह जगप्रसिद्ध आदिवासी वारली चित्रशैलीद्वारे सामाजिक जनजागृती उपक्रमात जिनीयस बुक ऑफ रेकॉड्स इंटरनॅशनल विक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. अनेक स्पर्धांत सुवर्णपदक मिळाले असून १५०० स्पर्धकांच्या स्पर्धेतही अव्वल कामगिरी केलेली आहे. १५ वर्षात वारली चित्रकलेची त्यांची विविध लक्ष्यवेधी चित्रे संग्रहात आहेत. शशिकांत खांडवी यांच्या वारली चित्रकला स्पर्धेतील यशाबद्धल इगतपुरीसह जिल्हाभरात कौतुक करण्यात येत आहे. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बापू येवला, महात्मा गांधी हायस्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष हेमंत सुराणा, प्राचार्य अनिल पवार, उपमुख्याध्यापक केशव पाटील, पर्यवेक्षक संजय चव्हाण आदींसह शिक्षकांनी शशिकांत खांडवी यांचे अभिनंदन केले आहे.