दरवर्षी शिवजयंतीला २ गरीब मुलींच्या शिक्षणाची घेणार संपूर्ण जबाबदारी – रुपेश नाठे : हिंदवी स्वराज्य ग्रुपची शिवजयंती आणि रंगपंचमी संपन्न

 इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

दरवर्षी शिवजयंतीच्या मंगल पर्वावर गोरगरिबांच्या घरातील लक्ष्मीस्वरूप २ मुलींच्या शिक्षणासह संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी उचलली आहे. मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब सुद्धा शिक्षणाचा वसा उचलेल ह्या विश्वासातून हा सामाजिक उपक्रम राबवला जाणार आहे. हिंदवी स्वराज्य उभे करणाऱ्या शिवरायांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या वारेमाप व्यर्थ खर्चात काटकसर करून शिवरायांना आनंद होईल असे सामाजिक उपक्रम राबवणे आवश्यक आहे. शिवछत्रपतींच्या विचारांनुसार युवापिढीने सर्वांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे. अशा विचारांनी झपाटलेल्या हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे हे शिवभक्त ओळखले जातात. तिथीप्रमाणे शिवजयंतीच्या निमित्ताने गोंदे दुमाला येथे विविध कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी रुपेश नाठे यांनी युवकांना आपल्या शैलीत मार्गदर्शन केले.

हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. मावळ्यांनी स्वराज्यासाठी रक्ताची रंगपंचमी केल्यामुळे सर्वांना हिंदवी स्वराज्य लाभले. भावी पिढीला याबाबत जाणीव होऊन संवेदना जाग्या व्हाव्यात यासाठी रंगपंचमीचे शानदार आयोजन करण्यात आले होते. ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी इगतपुरी तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील २ मुलींचा इंग्रजी अथवा मराठी माध्यमातील होणारा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा संकल्प जाहीर केला. आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. शिवजयंती निमित्ताने दरवर्षी २ गोरगरीब मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचा सर्व खर्च हिंदवी स्वराज्य ग्रुप करणार आहे. गोर गरीबाचे मुल घडले तर माझे आयुष्य सत्कारणी लागले असे मी समजेल असे मनोगत रुपेश नाठे यांनी यावेळी व्यक्त केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!