खुशखबर : जनसेवा प्रतिष्ठान  आणि घाटनदेवी मंदिर ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा : २५ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आयोजकांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६

जनसेवा प्रतिष्ठान व घाटनदेवी मंदिर ट्रस्ट इगतपुरी यांच्यातर्फे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.  गेल्या दोन वर्षातील कोरोनामय परिस्थितीमूळे अनेकांचे रोजगार जाऊन शिक्षण सुद्धा थांबले. बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमूळे अनेक विवाहपात्र वधू वरांचे विवाह सुद्धा थांबले आहेत. यामुळेच जनसेवा प्रतिष्ठान व घाटनदेवी मंदिर ट्रस्ट, इगतपुरीतर्फे आर्थिक दुर्बल, कोरोनाग्रस्त परिवारातील वधुवरांसाठी मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ३ मे २०२२ रोजी होणार असून यासाठी पात्र वधू वरांनी किंवा परिवाराने २५ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वराचे वय २१ वर्षे तर वधूचे वय १८ वर्षे पुर्ण असावे. ( कागदोपत्री पुरावे सोबत असावे ), आर्थिक दुर्बल घटक असणे आवश्यक आहे. कोरोनाजन्य परिस्थितीमूळे निर्माण झालेल्या परिस्थितीतील परिवारास प्राधान्य असणार. ह्या सामुदायिक सोहळ्यात वधू वरांना कन्यादानाचे भांडे, वधू व वराच्या विवाहासाठी कपडे, वधू वर यांच्या दोन्ही बाजू कडील ५०-५० नातेवाईकांचे भोजन आदी फायदे मिळणार आहेत. विवाहानंतर वधू-वरांनी आयुष्यात कसे वागावे, नवीन घरात प्रवेश केल्यानंतर वधूंनी सासरच्या मंडळींशी कसे समरस व्हावे, तसेच आरोग्य विषयक जागरूकता, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी भावना अशा सामाजिक जाणिवांचे समुपदेशन केले जाणार आहे. या विवाह सोहळ्यास सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वधुवरांच्या नातेवाईकांनी ज्ञानेश्वर लहाने ९९२१२६४४६८, बाळासाहेब सुराणा ९२७००५६५२७, ताराचंद भरिंडवाल ७७५७९१८४११, किरण फलटणकर ९२२५०७५५५५ / ७२१८९२२५५२ यांच्याशी २५ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Advt

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!