शरद मालुंजकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
शेतकऱ्यांची वीज तोडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वाडीवऱ्हे वीज वितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. आज सकाळी १० वाजेपासून शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जो पर्यंत विना अट वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत येथून उठनार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. यावेळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार शिवराम झोले, शेतकरी संघटनेच्या पश्चिम महिला आघाडीच्या सीमा नरवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ, अर्जुन बोराडे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे, वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, माजी सरपंच गणपत जाधव, किसन शिंदे, मुरंबीचे सरपंच बापू मते, उपसरपंच दत्तू मते आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी संघटनेने काल तहसीलदार, पोलीस स्टेशन, वीज वितरण कार्यालय, इगतपुरी वाडीवऱ्हे यांना आंदोलनाचे निवेदन दिले होते. शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता वीज वितरण कंपनीने शेतीची विज तोडल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले. त्यांनी वीज कार्यालयावर मोर्चा नेत जो पर्यंत विनाअट वीज पुरवठा पूर्ववत होत नाही तोपर्यंत आम्ही कार्यालया समोरून हलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरण तणावग्रस्त बनले होते. यावेळी नाशिकचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी शासनाच्या धोरणानुसार सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरून सहकार्य करावे अशी भूमिका मांडली. मात्र शेतकऱ्यांनी ती नाकारली. खासदार हेमंत गोडसे यांनी देखील शेतकऱ्यांसोबत असल्याची भूमिका घेतली.