इगतपुरीनामा न्यूज, दि. २९
समाजासह शिक्षकांच्या अविरत साहाय्याने मिळालेल्या ज्ञानामुळे विविध क्षेत्रातील प्रगती साधणे शक्य झाले. त्यामुळे ह्या सर्वांचे ऋण आमच्यावर आहे. ते फेडण्यासाठी समाजाच्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे. सामाजिक साहाय्य करतांना करीत असलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांनी शाळेसह शिक्षक आणि आईवडिलांचा नावलौकिक वाढवून ह्याची उतराई करावी. धामडकीवाडी शाळेला केलेली मदत सत्कारणी लागल्याने आमची मान उंचावली आहे. आगामी काळातही समाजासाठी सातत्याने चांगले काम करण्यासाठी कटिबद्ध आहे असा शब्द अमेरिकास्थित सामाजिक कार्यकर्ते अभिनव अजमेरा यांनी दिला. इगतपुरी तालुक्यातील “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” साठी मदत करून ह्या शाळेला देशभर प्रसिद्ध करणारे अभिनव अजमेरा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या ज्ञानधारा ह्या सर्वांसाठी अमृतधारा बनवण्यासाठी प्रत्येकाने शिक्षणाचा वसा घ्यावा असे ते शेवटी म्हणाले.
लहानपणापासून दातृत्वाची भावना निर्माण होण्यासाठी अभिनव अजमेरा यांनी आपली सुकन्या अर्षिका हिला सुद्धा सोबत आणले होते. ह्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहता यावी यासाठी त्यांनी तिला धडे दिले. अर्षिका हिच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना लाडू, फ्रुटी आदी वस्तूंचे वाटप केले. अर्षिका हिच्या चेहऱ्यावर निर्माण झालेली आनंदाची भावना सर्वांसाठी सुखद ठरली. विद्यार्थ्यांसोबत बसून तिने दुर्गम शाळेचा आस्वाद घेतला.
इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ही अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात असणारी जिल्हा परिषदेची शाळा आहे. ह्या शाळेला लागणाऱ्या अनेक सुविधा आणि विद्यार्थ्यांना नियमित मदतकार्य करण्यासाठी अभिनव अजमेरा कृतिशील असतात. अमेरिकेत असूनही ह्या शाळेला विविध मदत देण्यासाठी त्यांच्याकडून संपर्क साधला जात असतो. गेल्या काही वर्षांपासून ह्या शाळेला दिल्या जाणाऱ्या मदतीचा काय फायदा झाला याची त्यांनी आज पाहणी केली. सर्व विद्यार्थ्यांसोबत मनमोकळा संवाद साधून त्यांनी शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले. नैसर्गिक साधनसामुग्री वापरून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुंदर फुलांचे गुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत झाले. राज्य आदर्श शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रमोद परदेशी यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीचा लेखाजोखा सादर करून पाहुण्यांचे मन जिंकले. पेहेचान प्रगती फाउंडेशन आणि अजमेरा परिवाराचे ग्रामस्थ आणि शिक्षकांनी आभार मानले. याप्रसंगी अभिनव अजमेरा, शीतल अजमेरा, अभिषेक अजमेरा, गुंजन अजमेरा, अनुज अजमेरा, शिखा अजमेरा, अभिलाषा अजमेरा यांनी शाळेची माहिती घेतली. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रमोद परदेशी, शिक्षक दत्तू निसरड, गोकुळ आगिवले, खेमचंद आगिवले, लहानू आगिवले, लक्ष्मण आगिवले, चांगुणा आगिवले आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.