प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
भुसावळ – इगतपुरी दरम्यान नव्याने सुरू झालेल्या मेमु या नवीन रेल्वेगाडीने अस्वली स्टेशन ते पाडळी रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करीत इगतपुरी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे यांनी नव्या रेल्वेगाडीसह चालकाचे अनोख्या पद्धतीने उत्साहात स्वागत केले. जिल्ह्यातील प्रवाशांसाठी सोयीची असणारी मेमु ही रेल्वेगाडी खासदार हेमंत गोडसे, खासदार भारती पवार यांच्या पाठपुराव्याने सुरू झाली आहे. त्यामुळे समाधानाचे वातावरण असुन या गाडीच्या स्वागतासाठी पाडळी रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने व मोठ्या उत्साहात पंचक्रोशीतील नागरिक जमले होते.
यावेळी मेमु ही गाडी अस्वली रेल्वे स्थानकावर २ वाजता आलेली मेमु गाडी २ वाजुन १० मिनिटांनी पाडळी रेल्वे स्थानकावर येऊन थांबली. यावेळी इगतपुरी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे यांनी अस्वली ते पाडळी रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करुन मेमु रेल्वेगाडी व गाडीच्या चालकाचे स्वागत केले. याठिकाणी जमलेल्या मान्यवरांनीही पाडळी रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात स्वागत केले. पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, घोटी बाजार समितीचे माजी संचालक विष्णु पाटील राव, उपसरपंच बाळासाहेब आमले, संजय धोंगडे, सोमनाथ चारस्कर, पंडित धांडे आदींसह लहान मुले व परिसरातील नागरिकांनी रेल्वेगाडीला हात देऊन गाडी थांबवली. यावेळी गाडीच्या वाहकाचा हार, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आजच सुरू झालेल्या या रेल्वेगाडीमुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पॅसेंजर गाडीची प्रतीक्षा संपली असल्याने प्रवाशांना चांगला दिलासा मिळाला आहे.