इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोना महामारीसह सर्व संकटांचा नाश करावा अशी प्रार्थना गणेशभक्तांनी गणरायाला केली. माणिकखांब येथील सार्वजनिक गणपती आणि घराघरातील गणपतींचे विसर्जन दारणा नदीच्या पात्रात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. पारंपरिक भजनांच्या गजरात टाळ मृदंगाच्या आवाजात विघ्नेश्वराला निरोप देण्यात आला. यावेळी महिला, युवतींनी रिंगण घालून फुगड्या खेळल्या. गणपती बाप्पा मोरयाच्या ललकाऱ्यांनी लहानथोर मंडळी दंग झाली होती. सायंकाळपर्यंत विविध गणपतीचे विसर्जन सुरूच राहणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील दारणा, मुकणे, ओंडओहोळ, भाम, कडवा, वैतरणा, भावली, वाकी खापरी, नगरपालिका तलाव आदी ठिकाणी शांततेत गणपती विसर्जन करण्यात आले. सकाळपासून आरत्यांचा आवाज, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला अशा गजराने वातावरणात भक्तिमयता निर्माण झाली होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून इगतपुरी तालुक्यात सूक्ष्म लक्ष ठेवून गर्दी होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले होते.
