शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
सर्वसामान्य शिवसैनिकांचे विविध प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील काही शिवसैनिक पायपीट करून मुंबईला जात आहेत. गंगापूर तालुक्यातील सावखेडा ते मुंबईची मातोश्री असा ४०० किमी पायी प्रवास इगतपुरीला पोहोचला आहे. सामान्य शिवसैनिक आणि सामान्य नागरिकाला न्याय मिळण्यासाठी पक्षप्रमुखांकडे प्रश्न मांडण्यासाठी शिवसैनिक मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत.
गंगापुर तालुक्यातील सावखेडा येथील हे शिवसैनिक असून त्यांनी तब्बल ४०० किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला आहे. ह्या पायी प्रवासात सावखेडा येथील राजुशेठ जैस्वाल यांच्यासह रामनाथ लक्ष्मण मोरे, ज्ञानेश्वर विनायक आदमाने, नवनाथ शिवाजी शेवाळे हे शिवसैनिक सहभागी आहेत. आज हे शिवसैनिक इगतपुरीत दाखल झाले. इगतपुरीतील शिवसैनिक भूषण जाधव व मनसैनिक राज जावरे यांनी मित्र मंडळीसह त्यांचे स्वागत करून पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वसामान्यांच्या अडचणी मांडण्याकरता हा पायी प्रवास असून मुख्यमंत्र्यांकडे सर्वसामान्य शिवसैनिकांचे प्रश्न मांडणार असल्याचे शिवसैनिक म्हणाले. शिवसेनेतील गटबाजी थांबवावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, सामान्य शिवसैनिकांना त्याच्या प्रॉपर्टीवर कर्ज उपलब्ध करून द्यावे असे विविध प्रश्न घेवून हे शिवसैनिक मुंबई मातोश्री येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पायी प्रवासाला निघाले आहेत.