९०५ विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये तर २ हजार ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत झाले उत्तीर्ण : सर्व शाळांचा शंभर टक्के निकाल
विजय पगारे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
यावर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने शालांत परीक्षेचा निकाल कसा आणि काय लागतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार व शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या सूचनेनुसार नुकताच दहावीचा निकाल घोषित झाला. इगतपुरी तालुक्यात ६७ शाळांतील विद्यार्थ्यांनी भरीव प्रगती केली. तालुक्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला असून तालुक्यात ९०५ विद्यार्थी डिस्टिंगशन मध्ये तर २ हजार ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत
इगतपुरी आदिवासी तालुका असला तरी शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडविले आहे. इगतपुरी तालुक्यात इंग्रजी माध्यमापासून तर आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेपर्यंत अनेक शाळा आहे. खाजगी संस्थांपासून ते शासनाच्या शाळा आहेत. इगतपुरी तालुक्यात अशा एकूण ६७ शाळांमधून जवळपास ४ हजार १७ विद्यार्थी, विद्यार्थिनी परीक्षेस बसले होते. त्यात ४ हजार १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे ९०५ विद्यार्थी डिस्टिंगशन अर्थात उच्च श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. तसेच २ हजार ३० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी गाठली. तर १ हजार ५६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले तर तालुक्यात अवघे २४ विद्यार्थी ग्रेड पास मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळातील निकाल समाधानकारक असून गुणवत्ता व टक्केवारीही चांगली गाठली आहे. इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कुल मधील ४२ विद्यार्थी उच्च श्रेणीत तर १६० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. घोटीतील आदर्श कन्या विद्यालयातील ५८ विद्यार्थिनी उच्च श्रेणीत आल्या आहेत. तर वाडीवऱ्हे येथील ६७ विद्यार्थी उच्च श्रेणीत तर ८५ विद्यार्थिनी प्रथम उत्तीर्ण झाल्या आहे. घोटी येथील जनता विद्यालय येथेही ११७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर १७ विद्यार्थी उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.