इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ ( प्रभाकर आवारी, मुकणे )
कोरोनाची साखळी तुटण्यासाठी सर्वत्र कडक लॉकडाऊन सुरू आहे. यासह शासनाच्या कडक सुचना असतांनाही मुकणेजवळ कावनई रोडवरील सीटीआर कंपनी नियम मोडुन बिनदिक्कतपणे सुरूच होती. ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार कंपनी बंद करण्यास सांगुनही कंपनी व्यवस्थापन त्यास जुमानत नसल्याने आज ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेत कंपनी बंद पाडली. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ग्रामपंचायतीने ही भूमिका घेतली.
इगतपुरी तालुक्यातील मुकणे, पाडळी हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. दोन्ही गावात व विशेषतः मुकणे गावातील कंपनी परिसरात मृत्यू झालेले आहेत. असे असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करीत सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता कंपनीत शेकडो कामगार बांधकामासाठी येत होते. याबाबत मुकणे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कंपनीला दोनदा पत्र देऊनही त्यास न जुमानता काम सुरूच होते.
अखेर आज घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, सदस्य गणेश राव, मोहन बोराडे, निवृत्ती आवारी, पोपट वेल्हाळ, रघुनाथ राव आदींसह पदाधिकारी कंपनीच्या गेटवर गेले. सुरवातीला गेटच्या आतच येऊ देत नसणाऱ्या कंपनी प्रशासनाला घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु राव यांनी खडसावले असता कंपनी प्रशासनाचे व्यवस्थापक बी. एस. दळवी यांनी नरमाईची भूमिका घेऊन कंपनी बंद करण्याचे मान्य केले.
मुकणे गावात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असतांना कंपनी शिवारातीलच अनेक शेतकरी कुटुंब कोरोनाने बाधित झाली आहेत. या शिवारात काही मृत्यूही झाले आहेत. असे असतांना व ग्रामपंचायतने पत्र देऊनही त्यास न जुमानता कंपनी व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवले होते. याविरोधात आज घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कंपनीवर आक्रमक भूमिका घेत कंपनी बंद करण्यास भाग पाडले.
कोरोनामुळे सर्वत्र भयावह परिस्थिती असतांना सीटीआर कंपनी व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत होती. शेकडो कामगारांच्या हजेरीत सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता कंपनीत बांधकाम सुरू होते. ग्रामपंचायतच्या पत्रासही कंपनी प्रशासन जुमानत नसल्याने आज कंपनीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना नेऊन कंपनी बंद करण्यास भाग पाडले. याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे कंपनीची तक्रार करणार आहोत.
- विष्णु पाटील राव, संचालक, कृउबा घोटी