
इगतपुरीनामा न्यूज – जिल्हाधिकारी नाशिक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील एकल महिला यांना मुख्य प्रवाहात आणणे व त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे. इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे, पांडुरंग पाडवी, रवींद्र अहिरे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रचंड मेहनत घेतली. या अनुषंगाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये राहणाऱ्या विधवा महिलांवर लादल्या जाणाऱ्या परंपरागत सामाजिक बंधनांमध्ये शिथिलता आणण्याबाबत विचार करण्यात आला. अनेक ठिकाणी विधवा महिलांना कपाळी टिकली न लावणे, गळ्यात मंगळसूत्र न घालणे, हातात हिरव्या बांगड्या न घालणे, सौभाग्यचिन्हे वापरण्यास मज्जाव करणे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात सहभागास मर्यादा घालण्याच्या प्रथांचा प्रभाव आजही दिसून येतो. महिलांच्या स्वाभिमान, समानतेचा हक्क आणि सामाजिक सक्षमीकरण लक्षात घेता या सर्व बंधनांवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास अनुसरून इगतपुरी तालुक्यातील एकूण ९७ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित निर्बंध शिथिल करण्यास एकमताने मान्यता देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील एकल व विधवा महिलांना सामाजिक समावेशनाची संधी मिळून त्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.