
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील महत्वाचा वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गट आहे. ह्या गटाचा सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर अनेक मूलभूत समस्या सर्वांसमोर आ वासून उभ्या दिसतात. अस्वली जानोरीला जोडणारा पूल चार वर्ष अपूर्णावस्थेत आहे. ह्या गटात वाडीवऱ्हे, गोंदेदुमाला एमआयडीसी असूनही स्थानिक कुशल तरुणांना हक्काचा रोजगार नाही, आदिवासी वाड्या वस्त्यासह विविध गावांतील खड्डेमय रस्ते वर्षानुवर्षे जैसे थे आहे. दुर्दैवाने वाडीवऱ्हे गटाची ओळख समस्यांचे माहेरघर म्हणून बनली आहे. दोन दोन धरणे असूनही शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा आणि व्यवस्थापन खऱ्या अर्थाने झालेलेच नाही. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. अनेक नागरिक रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करताहेत. औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवक वगळण्यात येतात. गटात ४ राष्ट्रीयकृत बँका असूनही स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छुकांना कर्ज मिळत नाही. उच्चशिक्षणासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. कुपोषण आणि बालमृत्यूचा विषयसुद्धा गंभीर आहे. ह्या भयानक परिस्थितीवर मात करून वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटाला सर्वांगीण पद्धतीने विकसित करण्यासाठी गोंदेदुमाला येथील उच्चशिक्षित व्यक्तिमत्व डॉ. शरद मंगलदास तळपाडे यांच्याकडे व्हिजन आहे. गटाच्या विकासाचे अभ्यासात्मक व्हिजन घेऊन त्यांनी उमेदवारी करावी अशी मागणी जोर धरत आहे.
डॉ. शरद मंगलदास तळपाडे हे उच्चशिक्षित डॉक्टर असून वाडीवऱ्हे गटातील गोंदे दुमाला येथे त्यांचे ओम साई क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे. पाथर्डी फाटा येथील नामांकित वृंदावन मल्टीस्पेशालिटी प्रा. लि. चे ते संचालक म्हणून काम पाहतात. शालेय जीवनापासून युवासेनेचे तालुकास्तरीय सक्रिय काम करतांना लोकांवरील अन्यायाच्या विरोधात नियमित आंदोलने त्यांनी केली आहेत. २०१२ मध्ये पंचायत समिती निवडणुक आणि गतवर्षी विधानसभेची उमेदवारी करून त्यांनी त्यांचा जनसंपर्क व्यापक असल्याचे दाखवून दिले होते. दर्जेदार आरोग्य सेवेमुळे वाडीवऱ्हे गटात त्यांचा मोठा जनसंपर्क असून लोकांची विविध कामे करण्यासाठी ते नेहमी झटत असतात. कोरोनाच्या भयंकर काळात त्यांनी आपल्यातील डॉक्टर म्हणून असेलेले सगळे कौशल्य पणाला लावून शेकडो लोकांचा मौलिक प्राण वाचवला आहे. कोरोना रुग्णांना खाटा, इंजेक्शन, ऑक्सिजन, औषधे आणि मार्गदर्शन करून त्यांनी जीव ओतून काम केलेले आहे. गोरगरिबांसाठी मोफत अथवा माफक दरात त्यांनी आरोग्य सुविधा मिळवून दिल्या आहेत. आरोग्याच्या शासकीय योजनांचे अचूक मार्गदर्शन करून गरजू लोकांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणूनच अनेकांचे प्राण वाचवल्यामुळे डॉ. तळपाडे प्रत्येक गावातील विविध कुटुंबातील हक्काचे घटक बनून गेल्याचे दिसते. विविध आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, पेन, दप्तर, कंपास आदी शैक्षणिक साहित्य वाटपाचे उपक्रम त्यांच्याकडून नेहमीच राबवले जातात. स्नेहाचे संबंध, मधाळ बोलणे, कार्यतत्परता, जागरूकता, अन्यायाला वाचा फोडण्याची प्रवृत्ती, सहकार्याचे धोरण, चिकित्सक अभ्यासूपणाने निश्चित केलेले विकासाचे धोरण ही डॉ. शरद तळपाडे यांच्यातील गुणवैशिष्ठ्य आहेत. वाडीवऱ्हे गटातून त्यांनी उमेदवारी केल्यास निश्चितच त्यांच्यासाठी सर्व गावांतून फौजफाटा उपलब्ध होईल. विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
