
इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ओमकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओमकार पवार हे नासिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मितल यांची मागच्या बुधवारी जालन्याच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता. शासनाने आज दुपारी या पदावर इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी ओमकार पवार यांची नियुक्ती केलेली आहे. ओमकार पवार हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून इगतपुरीमध्ये त्यांची पहिलीच नियुक्ती होती. १६ ऑक्टोबर २०२४ पासून ते इगतपुरी येथे कार्यरत होते. या काळात त्यांनी इगतपुरी व त्र्यंबक साठी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयाचे या भागातील नागरिकांनी स्वागत केले होते.ओमकार पवार यांच्या नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची श्रेणी ही कनिष्ठ श्रेणी करण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश हे व्ही. राधा यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपल्या पदाचा पदभार उद्या बुधवारी स्वीकारण्याची शक्यता आहे.