
इगतपुरीनामा न्यूज – आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक व सार्वजनिक बांधकाम( आदिवासी ) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मुंढेगाव शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा येथे आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करणे, इमारतीचे व डिजिटल एनवायरमेंट, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेच्या राज्यस्तरीय प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. अशोक ऊईके, अन्न औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ उपस्थित होते. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच होत आहे. शासकीय आश्रमशाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आमचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी विभागाची कौतुकास्पद बाब आहे. ज्या समाजातून मी आलो आहे त्या घटकांना आश्रमशाळेबद्दल विश्वास वाढला पाहिजे. मोठ्या अपेक्षेने मुलांना आश्रमशाळेत घालतात. चांगले शिक्षण मिळाले नाही तर पुढील येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. यासाठी आदिवासी आश्रमशाळामध्ये उत्तम शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असून आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. आदिवासी बांधवांचा विश्वास तुटता कामा नये म्हणून विविध उपाययोजना आखल्या आहे. आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी शासन अत्यंत सजग असून आदिवासी बांधवानी साथ दिल्यास विकासाला गती देण्याचे कार्य करू असा विश्वास आदिवासी मंत्री ना. अशोक ऊईके यांनी व्यक्त केला.
आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सव नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत व साहित्य वाटप करण्यात आले. डिजिटल एनवायरमेंट क्लासरूमचे कोनशीला अनावरण व उद्घाटन, राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव सोहळा, आदिवासी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना धनादेश वाटप, एएनएम नर्स किट वाटप, शबरी वित्त व विकास महामंडळाचे वाहन वाटप व लाभार्थ्यांना धनादेश वाटप, तहसील कार्यालयाचे वतीने आदिवासी बांधवांना जातीचे दाखले, आधारकार्ड वाटप करण्यात आले. एन. डी. गावित, अपर आयुक्त दिनकर पावरा, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, आदिवासी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता नीरज चोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, लकीभाऊ जाधव, तहसीलदार अभिजित बारावकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तन्वीर जहागीरदार, शिवसेनेचे शहराध्यक्ष भूषण जाधव, भाजपचे योगेश चांदवडकर आदी उपस्थित होते.