
भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – आजचा दिवस तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत काळाकुट्ट म्हणावा असा उगवला आहे. ज्यांना गुरू म्हटले जाते त्या शिक्षकानेच शाळेतील एक अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली आहे. या एका घटनेने तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचा पंचनामा चव्हाट्यावर मांडला आहे. आधीच आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे, ज्या थोड्याफार शिक्षणाच्या संधी तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध आहेत, त्यातही अशा घृणास्पद घटना घडणार असतील तर लोकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. टाकेद बुद्रुकच्या घटनेने तालुक्याच्या शिक्षण विभागाची राज्यभरात बदनामी होत असून याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत. गेली कित्येक वर्ष सुरू असलेले शिक्षण क्षेत्रातली ही अनागोंदी थांबणार तरी कधी? उद्विग्न सवालाला सध्या तरी तालुक्यात कोणाकडेही उत्तर नाही! तालुक्याचे नाव राज्यातच नव्हे तर देशात गाजवणाऱ्या चांगल्या शिक्षकांची सुद्धा यामुळे बदनामी होत असून झालेला प्रकार हा एकूणच तालुक्याचे शिक्षण विभागातली अनागोंदी चव्हाट्यावर मांडणारा आहे. आजची घटना ही निमित्त असली तरी यापूर्वी अशा काही घटना घडल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कधीकधी अशा घटना सामोपचाराने मिटवल्या जातात किंवा बळाचा गैरवापर करून संबंधितांना गप्प केले जाते. पालक आणि विद्यार्थी हे दोन्ही घटक शाळांसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र अशा घटनांमुळे पालक आणि विद्यार्थी या दोघांचा शिक्षण क्षेत्रावरचा विश्वास उडणार असेल तर गोरगरिब आदिवासी जनतेच्या शिक्षणाचे काय? त्यांनी कुणाकडे पाहावं? हा उद्विग्न सवाल या निमित्ताने उभा राहिला आहे.
तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील अनागोंदीचे हे आहेत ठळक मुद्दे – सोप्या आणि अवघड क्षेत्रातील शाळा : ज्या शाळा खरोखर अवघड म्हणव्यात अशा असतांनाही सोप्या क्षेत्रात आहेत, आणि अगदी इगतपुरी शहराला लागून असलेल्या काही शाळा चक्क अवघड क्षेत्रात आहेत. ठराविक मंडळींची सोयीच्या शाळांमध्ये वर्णी – नाशिक हून ये जा करायला सोयीस्कर म्हणून अगदी रोडवरच्या, प्रवासाला सोप्या अशा शाळांमध्ये वर्षानुवर्षे ठराविक मंडळी ठाण मांडून आहे. सगळ्यांच्या बदल्या होतात तेंव्हा यांच्या बदल्या का होत नसाव्यात! यामध्ये विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आघाडीवर आहेत. बेशिस्त अधिकारी आणि कर्मचारी – वास्तविक सर्वच विभागातल्या सगळ्यांनी आपापल्या मुख्यालयाला वास्तव्य करून राहणे बंधनकारक आहे, पण इगतपुरी तालुका मात्र याला अपवाद आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीतच, पण त्यांच्यावर ज्यांचा वचक असायला हवा ते अधिकारी तरी कुठे राहतात? तेही नाशिकहून अप डाऊन करण्यातच धन्यता मानतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जाब विचारणार तरी कोण? – मद्यधुंद अधिकारी आणि कर्मचारी : हायवेने प्रवास करत असतांना ठराविक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पार्ट्या सुद्धा होतात. पार्टीतले सगळेच नग दारूच्या नशेत असल्यावर कोणी कोणाला जाब विचारायचा हा प्रश्न उरतोच!
पार्ट्यांसाठी निधी येतो कुठून? – अधिकाऱ्यांच्या भोवती असलेले ठराविक कर्मचाऱ्यांचे कोंडाळे ह्या पार्ट्यांसाठी निधी संकलनाचे काम चोख पार पाडत असतो. यात काही मोजकीच टाळकी पुढे आहेत, ही तीच मंडळी आहे जी रस्त्यावरच्या सोयीच्या शाळांमध्ये कार्यरत आहे. शाळा सोडून पंचायत समितीतच ठाण मांडून बसणारेही बरेच कर्मचारी आहेत. बक्षिसांसाठी ठराविक रक्कम वसूल करणे, इतर कामांमध्ये तोडपाणी करणे अशी कामं ही ठराविक मंडळी अगदी आनंदाने करत असते. दहावी बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका कस्टडी साठी वर्षानुवर्षे ठराविक शिक्षकांची नेमणूक – हे काम सांभाळण्यासाठी इतर कोणतेही शिक्षक सक्षम नसावेत का? ठराविक लोकच का? हे फक्त ठराविक ठळक मुद्दे आहेत. याची जंत्री इथेच संपत नाही. यादी करायला घेतली तर भलीमोठी यादीच तयार होईल. या सगळ्या अनगोंदीचा एकत्रित परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर सातत्याने होत आहे. ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांनी आपल्याच विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवावी ही आजची घटना किती भयानक आहे, याचा विचार करून सुध्दा भीती वाटते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळण्याचा अक्षम्य अपराध करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्यावर ज्यांचा वचक असायला हवा त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे आता तालुक्याचे लक्ष लागून आहे. अशा घटनांमधून बोध घेवून सुध्दा पर्यवेक्षिय यंत्रणा अजूनही सुप्त अवस्थेतच असेल तर तालुक्याचे याहून मोठे दुर्दैव नाही. या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा होईलच, पण तालुक्यात सुरू असलेली ही अनागोंदी लवकरात लवकर थांबावी, या घटनेच्या निमित्ताने तरी पर्यवेक्षण यंत्रणा जागी व्हावी, कठोर उपाय केले जावेत आणि त्याची वस्तुनिष्ठ अंमलबजावणी केली जावी इतकीच अपेक्षा या निमित्ताने करता येईल.