
इगतपुरीनामा न्यूज – सतत दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन न्यायालयातील सुनावण्यांना हजर न राहणाऱ्या फरार संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. घोटी पोलीस ठाण्यामधील दबंग म्हणून ओळखणारे पोलीस हवालदार सागर सौदागर यांनी त्याला कल्याणमधून मोठ्या शिताफीने अटक केले आहे. हरेश्वर हरी उर्फ आकाश सदाशिव मोगरे वय वर्ष ३० रा. टिटवाळा पूर्व असे संशयित सराईत आरोपीचे नाव आहे. घोटी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कायदा कलम ३९५, ३९४, ४५७, ४५२, ३४२ आणि मुंबई कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर १४४/ २०१८ दाखल आहे. ह्या गुन्ह्यात सराईत आरोपी सुमारे दोन वर्षापासून कोर्टाच्या तारखांना हजर राहत नव्हता. तो फरार झालेला असल्यामुळे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त न्यायालय नाशिक यांनी अटक वॉरंट काढलेले होते. कोर्टाचे सक्त आदेश असताना घोटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सागर सौदागर, होमगार्ड सागर गवारी, पोलीस मित्र बाळू माळी यांनी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे जाऊन आरोपीच्या राहत्या घरी तपास केला असता तो मिळून आला नाही. त्याच्या मित्रांकडून गोपनीय माहितीद्वारे कल्याण तालुका पोलीस ठाणे मधील पोलीस उपनिरीक्षक दीपक कुशारे, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल बावदाने, पोलीस हवालदार बागुल यांच्या मदतीने गोपनीय माहिती द्वारे माहिती काढली. हा आरोपी पुन्हा एकदा फरार होत असताना त्याला कसोशीने प्रयत्न करून ताब्यात घेण्यात आले. घोटी पोलीस ठाण्यामधील दबंग म्हणून ओळखणारे पोलीस हवालदार सागर सौदागर यांनी त्याला घोटी पोलीस ठाणे येथे आणून अटक केली. आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालय नाशिक येथे पुढील कारवाईसाठी हजर करण्यात येणार आहे.