इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा एकमेव मतदासंघ नाशिक लोकसभा मतदारक्षेत्रात शिवसेना शिंदे गटाकडे आहे. ह्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार देणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेनेचा उमेदवार इगतपुरी मतदारसंघातून निश्चितच निवडून येणार आहे. या ठिकाणी शिवसेनेची जागा कायम न ठेवल्यास शिवसेनेला मोठे नुकसान होणार आहे. सर्व शिवसैनिकांची सुद्धा हिच भावना असून महायुतीमधील अन्य पक्षाचा उमेदवार शिवसैनिक सहन करणार नाहीत. या पार्श्वभूमीवर इगतपुरी त्र्यंबक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने कायम ठेवून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना रिंगणात उतरवावे अशी आग्रही मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा पदाधिकारी आणि दोन्ही तालुक्याचे पदाधिकारी यांनी केली आहे. ह्या मागणीसाठी आज शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे, सूर्यकांत लवटे आदी पदाधिकारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या भेटीला मुंबई येथे गेले आहेत. ह्या मतदारसंघात पक्षबांधणी आणि संघटन अत्यंत भक्कम असून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ हे निवडून येणारे सक्षम उमेदवार आहेत. शिवसेनेने त्यांना उमेदवारी देऊन इगतपुरी मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात कायम ठेवावा ही सर्वांची आग्रही मागणी ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाणार आहे.
इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा मतदारसंघ आदिवासी असून ठाकूर ठाकर आदिवासी समाज निर्णायक पद्धतीने मतदान करून इथला आमदार कोण हे ठरवत असतो. ७० हजारापेक्षा जास्त मतदार असलेल्या ठाकूर समाजाने दोन दिवसापूर्वी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासाठी सक्रिय पाठिंबा घोषित केला आहे. यासह माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांची व्होटबँक अन्य आदिवासी समाज, मराठा समाज, अन्य समाज यांच्या माध्यमातून अतिशय बळकट आहे. पारंपरिक शिवसैनिक सुद्धा धनुष्यबाण चिन्ह असेल तरच मतदान करतात. अशा स्थितीत ही जागा शिवसेनेकडे कायम राहिली नाही तर पक्षाला अभूतपूर्व असा मोठा फटका बसणार आहे. या सर्वांगीण बाबींचा विचार करून शिवसेनेने ही जागा शिवसेनेकडेच कायम ठेवून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनाच उमेदवारी द्यावी अशी सर्वांची प्रमुख मागणी आहे. शिवसेनेचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी आज करणार असून हे पदाधिकारी मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या भेटीला मुंबईत दाखल झाले आहेत.
ठाकूर समाजाशिवाय अन्य आदिवासी समाजाला शिवसेनेने उमेदवारी दिल्यास त्यांचा पराभव होतो ही बाब आतापर्यंत दिसून आली आहे. २००९ ला काशिनाथ मेंगाळ यांचा फक्त ३२०० मतांनी निसटता पराभव झाला. यावेळी काशिनाथ मेंगाळ यांचे पारडे अत्यंत जड असून यावेळी हा वचपा भरून काढला जाणार आहे. शिवसेनेने त्यांना इगतपुरीचे तिकीट न दिल्यास शिवसेनेचे खूप मोठे नुकसान होऊन पारंपरिक मतदार पक्षापासून दूर जातील. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे ही जागा निश्चितच काशिनाथ मेंगाळ यांना देऊन इगतपुरी कायम ठेवतील असे वाटते अशी भावना अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली.