इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य वंचित व उपेक्षित घटकाला पुढे जाण्यासाठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे. महिलांसाठी तर त्यांच्या कार्यामुळे सर्वच क्षेत्रात प्रगती झाली असून आज महिलांचे शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे असे प्रतिपादन इगतपुरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी खोडाळा महाविद्यालयातील प्रा. दीपक कडलग, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. एस. बी. फाकटकर, प्रा. आर. डी. शिंदे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी तसेच बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचण्यासाठी फुले दाम्पत्याचे कार्य अनन्यसाधारण असेच होय. प्रा. दीपक कडलग यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मराठी विभागाने आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी, सूत्रसंचालन प्रा. आर. डी. शिंदे यांनी तर आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. बी. फाकटकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .