इगतपुरीची जागा शिवसेनेकडे कायम ठेवून काशिनाथ मेंगाळ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी : ठाकूर समाजाचा मेंगाळ यांच्या पाठीशी राहण्याचा घेतला निर्णय : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय मान्य राहील – काशिनाथ मेंगाळ

इगतपुरीनामा न्यूज – माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांना मिळालेल्या आदिवासी विकास महामंडळ अध्यक्षपदाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याला पहिल्यांदा राज्यमंत्री दर्जा लाभला आहे. मात्र ह्या अध्यक्षपदामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघावरील उमेदवारीचा दावा काशिनाथ मेंगाळ यांनीही कायम ठेवला आहे. शिंदे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्कप्रमुख विजय करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, माजी खासदार हेमंत गोडसे आदी नेत्यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची इगतपुरीची जागा कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. काशिनाथ मेंगाळ हेच ह्यावर्षी निवडणूक जिंकून शिवसेनेची जागा राखू शकतात असा अनेक प्रकारे केलेला सर्व्हे सांगतो. दुसरीकडे ठाकूर ठाकर समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीत माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनीच उमेदवारी करावी, समाजाची ७० हजार मते मेंगाळ यांच्याच सोबत राहतील असा ठराव करण्यात आला. काशिनाथ मेंगाळ यांना विधानसभेत पाठवण्यासाठी संपूर्ण समाज त्यांच्याच पाठीशी असेल असे समाजाने ठरवले आहे. यासह इगतपुरी मतदारसंघातील विविध भागातून काशिनाथ मेंगाळ यांनी विधानसभेला लढा द्यावा, त्यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करण्याच्या भावना मांडल्या जात आहेत. 

काशिनाथ मेंगाळ यांची मतपेढी अत्यंत भक्कम अशी मानली जाते. ७० हजार मते असणारा स्वतःचा ठाकूर ठाकर समाज, अन्य आदिवासी समाज, बिगर आदिवासी समाज त्यांच्यासोबत कायमच असतो. २०१९ च्या निवडणुकीत निर्मला गावित यांची तिसरी टर्म रोखावी म्हणून आमदार हिरामण खोसकर यांच्यासाठी सर्वपक्षीय एकजूट झाली. काशिनाथ मेंगाळ हे त्यावेळी उमेदवारी करणार होते. मात्र हिरामण खोसकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी काशिनाथ मेंगाळ यांना २०२४ च्या निवडणुकीत  सोबत राहून निवडून देऊ असा शब्द दिला होता. म्हणून मेंगाळ यांनी त्यावेळी उमेदवारी केली नाही. यावेळी मात्र त्यांनी जय्यत तयारी, जनसंपर्क वाढवून कोणत्याही परिस्थितीत विजयी होणारच असा निश्चय केला आहे. त्यानुसार शिवसेना शिंदे गटातर्फे त्यांनी याआधीच उमेदवारीवर प्रबळ दावा केलेला आहे. विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. नंतर शासनाने श्री. मेंगाळ यांना राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्षपद दिले. यामुळे श्री. मेंगाळ विधानसभेला उमेदवारी करणार नसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. वरिष्ठ शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत. काशिनाथ मेंगाळ यांनीही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे उमेदवारीचा दावा कायम असल्याचे सांगितले आहे. काशिनाथ मेंगाळ यांची भक्कम मतपेढी त्यांना निश्चितच विजयाकडे नेणारी ठरणार असून समाजाने त्यांच्या सोबत राहण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील शिवसैनिकही पेटून उठले आहेत. इगतपुरी हा मतदारसंघ शिवसेना पक्षाकडे आहे. या ठिकाणी अन्य पक्षाला उमेदवारी दिल्यास पक्षाचे मोठे नुकसान होणार आहे. अशावेळी काशिनाथ मेंगाळ यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून हक्काची आणि निवडून येणारी इगतपुरीची जागा शिवसेनेकेडे कायम ठेवून मेंगाळ यांची उमेदवारी घोषित करण्याची मागणी जोर धरीत आहे.

इगतपुरीची जागा शिवसेनेकडे कायम ठेवावी अशी सर्वांची भावना आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आहेत. त्यांच्याकडून याबाबत निश्चितच योग्य निर्णय घेतला जाईल. त्यांचा निर्णय अंतिम मानून पक्षाच्या आदेशाचे पालन करील.
- काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार

Similar Posts

error: Content is protected !!