मृत बिबट्याचे ४ सुळे व १ नख वन विभागाने आरोपींकडून केले हस्तगत : इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिबट्याच्या शिकार प्रकरणात आज इगतपुरी वन विभागाच्या पथकाकडून शोधकार्य करण्यात आले. पिंपळगाव मोर येथील मोराचा डोंगर येथे शिकार झालेल्या जंगल परिसरात सकाळी ९ पासून दुपारी २ वाजेपर्यंत बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्याच्या इतर अवयवांचा शोध घेण्यात आला. ह्या शोधमोहीमेत वन विभागाचा कडक खाक्या दाखवल्यानंतर आरोपींच्या घरातून प्राण्याच्या हाडांचे अवशेष मिळाले आहेत. मिळालेले अवशेष हे प्रथमदर्शी बिबट्या ह्या वन्यप्राण्याचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील तपासणी साठी हे अवशेष प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे ४ सुळे व १ नख देखील हस्तगत केले आहे. ही महत्वपूर्ण शोधमोहीम नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पश्चिम भाग नाशिक, सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्यासह पेठ व ननाशी येथील वनक्षेत्र कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने पार पाडली. नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकाने मागील आठवड्यात सापळा रचुन संशयित नामदेव दामु पिंगळे, वय ३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी, संतोष सोमा जाखेरे, वय ४०, रा. मोगरे, ता. इगतपुरी, रविंद्र मंगळु आघाण, वय २७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी, बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी, वय ५०, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी, बाळु भगवान धोंडगे, वय ३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कब्जातील गोणपाटातून वन्यप्राणी बिबट्याची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त केला होता. यातील आरोपी नामदेव दामु पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लजवायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून ठार मारले. यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार इगतपुरीचे इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस हे आपल्या पथकासह कसून तपास करीत आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!