भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – धकाधकीच्या काळात, स्वतेजाने आपल्यातील माणुसकीचे दर्शन क्षणाक्षणाला घडवणारा, गुन्हेगारांचा कर्दनकाळ, लोकांचा सखा, लोकांना कायद्याचे राज्य देण्यासाठी कटिबद्ध असणारा खरा लोकसेवक, “समुद्रातील अनमोल मोती” म्हणजे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेचे कर्तव्यकठोर पोलीस निरीक्षक आदरणीय राजू सुर्वे साहेब. त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन त्यांना भारत देशाचा अमूल्य असा राष्ट्रपती पुरस्कार घोषित झाला आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी त्यांना तो पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित केला जाणार आहे. इगतपुरी येथे कार्यरत असताना सदरक्षणाय खलनिग्रनाय ब्रीदवाक्य अंगिकारून सर्वच लोकांसाठी जिव्हाळ्याच्या विषयांवर पोटतिडकीने व एकाग्रतेने व्यक्त झालेली सुर्वे साहेबांची शब्दसुमने मी अनुभवली आहेत. वाढती गुन्हेगारी, सामान्य लोकांवरील वाढता अत्याचार, वाढते अपघात आदींवर त्यांच्या मनातली खळबळ त्यांच्या शब्दांतून ओसंडत असते. मात्र ज्यावेळी कर्तव्याची वेळ येते त्यामध्ये Start To End समरसता दाखवणारा हा अधिकारी लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. पण ज्यावेळी सज्जनांचे आणि कायद्याचे रक्षण करायचे असेल त्यावेळी सज्ज होऊन त्या प्रकाशझोताला सामोरा जाणारा हा “खाकी वर्दीतला माणूस” कुणाचाच कुणी नसतो तर तो असतो एक अस्सल गुन्हेगारांचा कर्दनकाळ….अनेक अवघड गुन्ह्यांची उकल केल्याने नाशिक जिल्ह्यातील गुन्हेगारांसाठी सुर्वे साहेब खरोखर कर्दनकाळ ठरले आहेत. सर्व क्षेत्रातील आणि सर्व जातीधर्माच्या लोकांचा हा लाडका पोलीस अधिकारी यापेक्षाही मोठ्या सन्मानाला पात्र आहे. लोकाभिमुख पोलीस अधिकारी, खाकी वर्दीतील देव सन्माननीय पोलीस निरीक्षक आदरणीय राजू सुर्वे साहेबांचे राष्ट्रपती पुरस्कारबद्धल विशेष अभिनंदन..!
” मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या त्या मांसाच्या गोळ्याच्या रुपाने ईश्वराने जणू मला आवाहन केले होते, माझ्यातल्या माणुसकीला साद घातली होती. त्या अपघातग्रस्त जीवाला वाचवणं, निदान वाचवण्याचा प्रयत्न करणं हे सुद्धा माझ्यातल्या पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य होतं. पोलीस अधिकारी म्हणून काम करतांना अपघातग्रस्तांचे जीव वाचवणं हा उघडउघड परमेश्वरी संकेतच आहे. तो संकेत न टाळता एकाचवेळी पोलीस आणि माणूस ह्या भूमिका मला पार पाडाव्या लागतात असे अनेक शब्द राजू सुर्वे यांच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाकडून मला ऐकायला मिळालेले आहेत.”कार्यक्षेत्रात सापडलेल्या बेवारस असणाऱ्या १५ दिवसांच्या बालिकेकडून बघून तिला माणूसदेखील म्हणवत नव्हते. ज्या वर्तमानपत्रात तिला गुंडाळलं होतं ते जागजागी तिच्या अंगाला चिटकलं होतं. कुठे घाणीमुळे तर कुठे अंगावरील फोडांमुळे. तिच्या अंगावरील प्रत्येक वळींमध्ये सेप्टिक झालं होतं. श्वास तर इतका क्षीण होता की कधी थांबेल याचा नेम नव्हता. पण ज्याअर्थी १५ दिवस या जीवाने तग धरलाय व ईश्वराने पोलीस अधिकारी म्हणून माझ्या हातात सोपवलाय त्याअर्थी तिने जगावं व मी तिला जगवावं ही ईश्वराची इच्छा दिसतेय ; असं समजून मी त्या विझू घातलेल्या दिव्याभोवती आपली ओंजळ धरली.” पोलीस अधिकारी म्हणून राजू सुर्वे यांच्यातल्या मानवतेच्या ह्या शब्दसुमनांनी तर कालवाकालव निर्माण होते. गुन्हेगारी निर्दाळन, समाजाला विविधांगी मदत, गुन्हा निर्मितीला प्रतिबंध आणि समाजातील सर्व नागरिकांशी घरच्या माणसासारखा संबध जोडणाऱ्या ह्या सच्या पोलीस अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळणे आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे.