इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या दीपिका शरद नाठे यांनी मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इगतपुरी तालुक्यात त्यांचा पहिलाच राजीनामा असून अन्य गावांत राजीनाम्याचे सत्र सुरु होणार आहे. सकल मराठा बांधव गेली अनेक वर्षे आरक्षणासाठी लढा देत आहेत. समाज बांधवांवर होणारा अन्याय आता सहन होत नाही. या अन्यायाविरोधात लढण्यासाठी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे. दीपिका नाठे यांनी मराठा समाजासाठी दिलेल्या राजीनाम्यामुळे इगतपुरी तालुक्यात मराठा समाजातर्फे त्यांचे कौतुक करण्यात आले. माझ्या पत्नीने समाजासाठी अत्यंत धाडस दाखवून राजीनामा दिल्याने मला तिचा अभिमान वाटतो असे कौतुक त्यांचे पती शरद नाठे यांनी केले आहे.
दीपिका शरद नाठे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून आज आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला. लोकनियुक्त सरपंचांना त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. यावेळी यांच्यासमवेत गोंदे दुमाला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजीनामापत्रात सौ. नाठे यांनी म्हटले आहे की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. आरक्षणासाठी अनेक ठिकाणी मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांचे बलिदान वाया जाऊ नये, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे त्या म्हणाल्या.