
शाहाबाज शेख : इगतपुरीनामा न्यूज – काही दिवसापूर्वी टाकेद बुद्रुक येथील जैन मंदिरात चोरी झाली होती. घोटी पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल झालेला आहे. स्थानिक गुन्हा शाखेने ह्या गंभीर गुन्हाचा समांतर तपास करून दोन संशयितांना घोटी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर खराटे, प्रवीण सानप, गोरक्षनाथ संवत्सरकर, गांगुर्डे, तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले व प्रदीप बहिरम यांनी समांतर तपास केला. गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने घोटी येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार कुणाल किरण परदेशी वय २५ रा. सुरगाणा व केशव हिरामण पवार वय २२ रा. सुकापूर, ता. कळवण हे मूळ गावी आलेले असल्याचे समजले. माहितीच्या आधारे त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. नाशिक येथील आदर्शनगर बोरगड म्हसरूळ येथे त्यांचा मित्र हेमंत गायकवाड याच्या नकळत त्याच्या रूममध्ये त्यांनी मुद्देमाल लपवून ठेवला होता. त्यात ५ हजार किमतीचे ५०० ग्राम वजनाचे ७ ते ८ इंच उंचीची श्री शांतीनाथ स्वामी भगवान यांची पिवळ्या धातूची मूर्ती व ५ हजार रु किमतीची अंदाजे ५०० ग्राम वजनाची चपटी व गोलाकार श्री सिद्धचक्र भगवान यांची पिवळ्या धातूची मूर्ती असा मुद्देमाल पंचनामा करू ताब्यात घेतला. गुन्हा करतेवेळी वापरलेली बजाज पल्सर क्रमांक एमएच ४१ एवाय ८५२१ आणि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. संशयितांची वैद्यकीय तपासणी करून घोटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. इगतपुरी न्यायालयाकडून त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आवारी करत आहे.