
इगतपुरीनामा न्यूज – संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी आणि राज्यासह नाशिक मनपा क्षेत्रात मुकणे धरणातील पाणी सोडले जाते. यासाठी अस्वली, नांदगाव बुद्रुक, जानोरी, पाडळी ह्या गावांतून जाणाऱ्या ओंडओहोळ नदीचा वापर केला जातो. मात्र ह्या पाण्यामध्ये गोंदे, वाडीवऱ्हे भागातील कंपन्यांचे घातक केमिकल टाकले जात आहे. याबाबत या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून संशय होता. आज पहाटेच्या सुमाराला अस्वली – नांदगाव बुद्रुकला जोडणाऱ्या पुलावर घातक केमिकल पाण्यात ओतणारा टँकर नागरिकांनी पकडला आहे. टँकरचालकाने नागरिकांचा रोष पाहून वाहन सोडून पलायन केले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी ही घटना असून शेतकऱ्यांच्या जमिनी नापिक करण्यालाही कारणीभूत आहे. यासह केमिकलच्या दुष्परिणामामुळे कर्करोग, वंद्यत्व, लैंगिक समस्या, बौद्धिक दुर्बलता निर्माण होतांना दिसतात. केमिकलच्या पाण्यामुळे विहिरी, हातपंप दूषित होऊन नागरिकांना मरणपंथाला लावत आहेत. नागरिकांनी हा डाव उधळला असून संबंधित कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इगतपुरी तालुक्यातील गेल्या १५ ते २० वर्षांपासून नद्यांमध्ये घातक केमिकल ओतले जाते आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी देशमुख जवळील पुलावर केमिकल टाकले जात होते. येथील परिसर जागरूक झाल्याने तिथे टाकणे बंद करून अस्वलीजवळ ओंडओहोळ नदीच्या पुलावरून टाकायला सुरुवात झाली. याही ठिकाणी लोकांना माहिती झाल्याने संबंधित कंपन्या सावध झाल्या. आता नांदगाव बुद्रक जवळ असणाऱ्या पुलावरून केमिकल टाकले जात असल्याचे सिद्ध झाले आहे. नाशिकचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कोमात गेले की काय असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.