आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या उपक्रमामुळे मिळाली मदत
इगतपुरीनामा न्यूज, दि. २
कोरोनाच्या संसर्गामुळे विद्यार्थी आणि शाळांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. नव्या विद्यार्थ्यांना अद्याप शाळेचे दर्शनही मिळाले नसून शैक्षणिक साहित्याचा अद्याप मागमूस सुद्धा लागलेला नाही. जुन्या विद्यार्थ्यांना कोरोनापूर्व काळात शिकवलेले केंव्हाच भूतकाळात गेले असून विस्मरणात गेले आहे. मात्र इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम अवघड क्षेत्रातील धामडकीवाडी येथील “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” मुळे विद्यार्थी अजूनही शिक्षणाच्या प्रवाहात टिकले आहेत. आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या कौशल्यदायी पॅटर्नमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या घरात शिक्षणाचे धडे गिरवले जात आहेत. ह्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील ऊर्जा ग्रुपने अवघड क्षेत्रातील शिक्षणाची प्रगती अखंडित ठेवणाऱ्या शाळांना “ऊर्जा” देण्याचे नियोजन केले आहे. ह्यामुळे कोरोनातही शिक्षणाची गंगा थांबू न देता अखंड प्रवाहित करण्याचे प्रेरक काम सुरू झाले आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम अवघड क्षेत्रातील धामडकीवाडी, गरुडेश्वर ह्या गावांतील जिल्हा परिषद शाळांचे संस्थेच्या स्तरावर मूल्यमापन करण्यात आले. ह्यामध्ये ह्या दोन्ही शाळा उत्तीर्ण झाल्या. म्हणून मुंबई येथील ऊर्जा ग्रुपने ह्या दोन्ही शाळांना विविध दीर्घकालीन उपयुक्त शालेय साहित्य वाटप केले. यामध्ये बसण्याचे बाक 16, पंखे 3, संगणक 1, खुर्च्या 2, फळा 1, स्कुल बॅग 20, मोठे कपाट 2, पाणी पुरवठ्याची मोटार 1, सिन्टेक्स पाण्याची टाकी 1 आदी साहित्य शाळांकडे सुपूर्द करण्यात आले.
मुंबई येथील ऊर्जा ग्रुपच्या मधू मल्होत्रा, नूतन जैन आणि ग्रुपचे सर्व सदस्य यांनी केलेल्या सहाय्यामुळे आदिवासी अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना धडे गिरवायला मोठी मदत झाली असल्याची प्रतिक्रिया आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, ज्ञानेश्वर बांगर, दत्तू निसरड यांनी व्यक्त केली. दोन्ही शाळांतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्याकडून ऊर्जा ग्रुपची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आगामी काळात अधिकाधिक उपयोगी शैक्षणिक साहित्याचे साहाय्य करण्यासाठी तत्परतेने कटिबद्ध राहू असा शब्द मधू मल्होत्रा यांनी दिला.