
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – लग्न सोहळ्यामधील टॉवेल, टोपी, लुगडे, साड्या, फेटे, शाली यासारख्या प्रथा समाजाच्या सर्व क्षेत्रातील लोकांच्या खिशाला रिकामे करून कर्जबाजारी बनवतात. यामध्ये सर्वच समाजाला भरपूर अनाठायी खर्चांना सामोरे जावे लागते. दशक्रिया, वर्षश्राद्ध, जागरण गोंधळ यामध्ये अनिष्ट परंपरा लोकांचे कंबरडे मोडत आहेत. यातील सगळ्या वस्तू त्यानंतर काही दिवसात फेकाव्या लागतात. कार्यक्रमांमध्ये मानपान न मिळाल्यास पाहुण्यांचे रुसवे फुगवे सुद्धा वाढतात. म्हणूनच ह्या अनिष्ट प्रथा परंपरा थांबवण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन समाजाला दिशा देणे आवश्यक असल्याचे स्वराज्य संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष तथा धामणीचे सरपंच नारायण राजे भोसले यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत वारेमाप खर्चामुळे शेतकरी गरिबांच्या घरात कर्जबाजारीपणा वाढला आहे. ह्या पार्श्वभूमीवर नारायण राजे भोसले यांनी व्यक्त केलेल्या भावना प्रत्यक्षात याव्यात यासाठी इगतपुरी तालुक्यात जनजागरण केले जाणार आहे.
विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक रिकामा खर्च हाच कुटुंबाना उध्वस्त होणाऱ्या गोष्टीला कारणीभूत ठरत आहे. विवाहातील अनिष्ट प्रथा रोखवण्यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे. लग्नकार्यात भरमसाठ खर्च करून अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाल्याचे दिसत असून काही ठिकाणी लग्नाच्या खर्चासाठी कुटुंबाने जमिनीही विकल्याचे पहावयास मिळते. विवाहाच्या वाढत्या खर्चामुळे घरात जे काही होतं तेही गमवावे लागले. या सोहळ्यात मानपान, वाढती व्यसनाधीनता या गोष्टी उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत आहेत. कोरोना नंतर ह्या सगळ्या कुप्रथा वाढू लागल्या आहेत. हे थांबवून समाजाला दिशा देण्यासाठी तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक असल्याचेही नारायण राजे भोसले म्हणाले आहेत. आगामी काळात जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन इगतपुरी तालुक्यात जनजागृती चळवळ सुरु करणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.