
इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती प्रकाश केदारे यांना मिरॅकल इव्हेंटच्या वतीने “फेस ऑफ नाशिक मिसेस २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे आयोजित ह्या सौंदर्य स्पर्धेत मिसेस गटातील “फेस ऑफ नाशिक” मधून त्यांनी हे यश मिळवले. ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी ग्रामसेवक संवर्गातून सौंदर्यवती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला असून पहिल्याच प्रयत्नात आपली ओळख निर्माण केली आहे. सौंदर्यवती ज्योती केदारे यांच्यामुळे नाशिकला नवा चेहरा मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ज्योती केदारे वाकी बिटुर्ली ग्रापंचायतीसह कुऱ्हेगांव येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, विस्ताराधिकारी संजय पवार आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
आदर्श ग्रामसेविका, उत्कृष्ट सुत्रसंचालक, आदर्श गृहिणी म्हणुन ज्योती केदारे यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल जळगांव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पत्राद्वारे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. ग्रामसेवक संघटनेसह इगतपुरी तालुक्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समाजात अनेक स्त्रिया सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा यांच्या बंधनात अडकून मागे पडत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी महिलांना प्रेरणा देण्यासाठी त्या पुढे असतात. यातून महिला सक्षमीकरण होऊन महिलांचा सर्वागीण विकास होण्याच्या उद्देशातून त्यांनी या क्षेत्रात भरारी घेतल्याचे ज्योती केदारे म्हणाल्या.
पारंपरिकता सोडून नवनव्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी आमच्या महिला कुठेही कमी पडत नाहीत. महिलांना मिळालेली सक्षमता समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपयुक्त आहे. अनेक महिलांनी सौंदर्यवती स्पर्धेसारख्या आणखी काही क्षेत्रात यश मिळवावे यासाठी मी कायम पुढे असते. मला लाभलेले यश माझ्या महिला भगिनी आणि मला सहयोग देणाऱ्यांना मी समर्पित करते.
- ज्योती केदारे, सौंदर्यवती स्पर्धा विजेत्या ग्रामसेविका