इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – लहान बालकांना शिक्षणाबरोबरच आरोग्य, पोषण आहार आदी सुविधा मिळण्यासाठी शासनाने अंगणवाड्यांची यशस्वी निर्मिती केली. या माध्यमातून बालके शिक्षण घेतात. इगतपुरी तालुक्यात कुपोषण दूर करण्यासाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असल्याने मोठ्या अडचणी वाढल्या आहेत. अंगणवाड्याच्या मदतीने बालकांना मिळणारे संस्काराचे धडे थांबले आहेत. अनेक अंगणवाड्यांमध्ये सेविका, मदतनीस आदी पदे रिक्त असल्याने अंगणवाडीचे अतिरिक्त काम करणाऱ्यांची दमछाक होत आहे. रिक्त असलेली पदे तातडीने भरावी अशी मागणी सांजेगावच्या लोकनियुक्त सरपंच नीता गोवर्धने यांनी केली आहे.
अंगणवाडीत बालकांसाठी विविध कामे करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस पुरेशा प्रमाणात नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. इगतपुरी तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाड्या असून अंगणवाडी सेविका १४ तर मदतनीस ४३ अशी ५७ पदे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. सेविका व मदतनीस यांना कामाचा जादा बोजा घेऊन काम करावे लागत आहे. यासह बालकांचे नुकसान होते आहे. यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी नीता गोवर्धने यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी म्हटले आहे.