प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी तालुक्यातील मुकणे मुंढेगाव शिव हद्दीवरील मुकणे गायकुरणालगतच्या शेतात गवत कापत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला चढवला आहे. यामध्ये हा युवक गंभीर जखमी झाला आहे. मुकणे आणि परिसरातील गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी युवकाला उपचारासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इगतपुरी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातून करण्यात येत आहे.
मुकणे येथील प्रकाश अर्जुन बोराडे हा युवक दुपारी चार वाजेच्या दरम्यान जनावरांसाठी गवत कापायला मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगत शेतावर गेला. गवत कापत असतांना गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्रकाश याच्यावर पाठीमागुन हल्ला चढवला. बराच वेळ झटापट चालु असतांना आरडा ओरड ऐकून जवळील विटभट्टीवरील कामगार आणि काही शेतकऱ्यांनी बिबट्याला पिटाळुन लावले. यामुळे बिबट्याच्या तावडीतुन प्रकाश याची सुटका झाली. जखमी अवस्थेत प्रकाश याला घोटी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहे. ह्या भागात अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर असुन अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील पाळीव प्राण्यांना बिबट्याने भक्ष्य बनवले आहे. मात्र वनविभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावला जाऊन त्या पिंजऱ्यात काहीही ठेवत नसल्याने बिबट्या पिंजऱ्यात जात नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.