इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
जुलै २०१८ मध्ये दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोललनाचा एल्गार झाला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन युवा प्रदेशाध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जाणारा दूध पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामध्ये कसारा घाटात शेतकरी आंदोलक आणि दूध वाहक टँकरच्या बंदोबस्तासाठी असणारे पोलीस पथक यांच्यामध्ये एकच संघर्ष झाला होता. इंजि. हंसराज वडघुले, दीपक पगार, नितीन रोठे पाटील, सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, संजय जाधव, युवराज देवरे या सात आंदोलकांवर कसारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानुसार ह्या आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या घटनेत टँकरची हवा सोडणे, तोडफोड करणे, संरक्षण देणाऱ्या पोलीस पथकाला धक्काबुक्की करणे आदी गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंद करण्यात आले होते. आंदोलकांना महिनाभर तळोजा सेंट्रल जेल मुंबई येथे तुरुंगवासात टाकण्यात आले होते. तेव्हापासून कल्याण सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. आंदोलनात सर्व महत्वपूर्ण पदाधिकारी असल्याने आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारच्या सूचनेनुसार या आंदोलकांना ताब्यात घेऊन खोटे गुन्हे दाखल केले. आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन सरकारने पोलीस प्रशासनाला तशा सूचना केल्या होत्या असा युक्तिवाद आंदोलकांच्या वकीलांनी न्यायालयात केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कल्याण यांनी हा युक्तिवाद मान्य करून सातही आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली आहे.
आंदोलकांतर्फे सुप्रसिद्ध वकील ॲड. जगदीश वारघडे, ॲड. प्रसन्ना बारसिंग यांनी युक्तिवाद केला. साडेचार वर्ष कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. न्यायमूर्ती पी. आर. आस्तुरकर यांनी १२ ऑगस्टला आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली. या दरम्यान आंदोलकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. तुरुंगवासाच्या काळात शहापूर येथील विनायक पवार, बबन हरणे, चंद्रकांत भोईर ह्या चळवळीतील शिलेदारांनी आंदोलकांना संपूर्ण सहकार्य केले. निकाल जाहीर होताच जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी
आनंद व्यक्त केला. साहेबराव काका मोरे, सुधाकर मोगल, भाऊसाहेब तासकर, रतन मटाले, आण्णा निकम, संजय पाटोळे, निवृत्ती घारे, संदीप जगताप, सचिन कड, संपत जाधव, सागर बोराडे, वैभव देशमुख, सचिन पवार, निलेश कुसमोडे, मनोज भारती, दीपक भदाणे, निलेश काका चव्हाण, परशराम शिंदे, विक्रम गायधनी, लकी बावस्कर, रवींद्र पगार ( सिन्नर ), आत्माराम पगार, श्रावण देवरे, डोंगर अण्णा पगार, गोविंद पगार, राजू शिरसाठ, योगेश कापसे, प्रभाकर वायचळे, समाधान भारतीय आदी शेकडो कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.
आंदोलनाच्या दणक्याने अधिवेशन काळात विरोधी पक्षाने सरकारवर हल्लाबोल केला होता. तत्कालीन सरकारला लिटर मागे ५ रुपये भाव वाढवून द्यावे लागले होते. त्यामुळे आमच्या सारख्या मोजक्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. तरी लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना होती. शेतकरी हिताची ही लढाई शेवटच्या श्वासापर्यंत अव्याहतपणे सुरूच राहील सत्यमेव जयते. बचेंगे तो और भी लढेंगे.
- इंजि. हंसराज वडघुले पाटील