लेखन : निवृत्ती यशवंत नाठे, शिक्षक नेते इगतपुरी
ग्लोबल टीचर रणजीतसिंह डिसले यांनी नुकताच राजीनामा दिल्याचे वृत्त सर्व महाराष्ट्राने पाहिले. जागतिक पातळीवरील ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळवणारा देशातला एकमेव शिक्षक. क्युआर कोडच्या माध्यमातून जगभरातील पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांशी बोलकी करणारा जगातला एकमेव शिक्षक अशी ओळख असणाऱ्या रणजितसिंह डिसले गुरुजींना या व्यवस्थेने नामोहरम केले. शेवटी शिक्षक शिक्षण क्षेत्राला कायमचा रामराम ठोकण्याची वेळ या शिक्षकावर आली. पुरोगामी आणि प्रगत समजणाऱ्या महाराष्ट्रामधील जगावेगळे काहीतरी करू पाहणाऱ्या दोन शिक्षकांचा या व्यवस्थेने गेल्या वर्ष-दीड वर्षांमध्ये बळी घेतल्याचे समस्त महाराष्ट्राने पाहिले.
लोकसहभागातून जागतिक दर्जाची वाबळेवाडीची शाळा उभी करणारे दत्तात्रय वारे गुरुजी असतील किंवा वाडी वस्ती, खेड्यापाड्यातील किंवा मेट्रो सिटी मधील सर्व विद्यार्थ्यांशी पुस्तकांना बोलकं करून शिकणं सहज सुलभ करणाऱ्या रणजीतसिंह डिसले गुरुजी असतील. या दोन्ही गुरुजींनी संपूर्ण शिक्षक वर्गाची मान जगात उंच होईल असं कार्य करून दाखवलं. परंतु या गुरुजींनी केलेलं हे महान कार्य या व्यवस्थेला सहन झालं नाही आणि या ना त्या कारणाने या गुरुजींना बाहेर काढण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले गेले. रणजीतसिंह डिसले गुरुजी असतील किंवा वारे गुरुजी असतील हे क्षेत्रातील महान हिरो आहेत. परंतु त्यांना एखाद्या गुन्हेगाराला दिली जाईल अशी वागणूक देऊन या महाराष्ट्रामध्ये अपमानित केलं गेलं. हे सगळं घडत असताना शिक्षकांच्या मोठमोठ्या संघटना मात्र मूग गिळून गप्प बसल्या आहेत. शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत मिळवणाऱ्या एकाही सन्माननीय शिक्षक आमदाराला या विरोधात विधानसभेत आवाज उठवावा असं वाटलं नाही हे देखील ह्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
महाराष्ट्रामध्ये असं अनेक शिक्षकांच्या बाबतीत घडत आहेत. जे शिक्षक काहीतरी जगावेगळे करू पाहतात. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करू पाहतात. अशा असंख्य शिक्षकांना त्रास देण्याचे काम व्यवस्थेमधील शुक्राचार्य करत असतात. रणजितसिंह डिसले आणि दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय होते. म्हणून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल कुठे वाच्यता तरी झाली. परंतु या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये असंख्य गुरुजींना या व्यवस्थेतील शुक्राचार्यांच्या त्रासाला बळी पडावं लागत आहे. त्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये अशी कामे करणाऱ्यांना धमकी देण्यासाठी ‘तुमचा वारे नाहीतर डिसले करू’ अशी म्हण प्रचलित होऊ पाहत आहे.
महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या 38 संघटना असल्याचं बोललं जातं. पण यातील एकाही संघटनेला या गुरुजींच्या पाठीशी उभं राहावं असं वाटलं नाही. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ह्या एक शतकाची परंपरा असलेली राज्यातील सगळ्यात मोठ्या शिक्षक संघटना. तसेच राज्य प्राथमिक शिक्षक समिती या दोन्ही मोठ्या संघटनांना याबाबतीत काहीच करावं असं वाटलं नाही. शिक्षकांचं जीवनमान उंचावण्यामागे शिक्षक संघटनांचा मोठे योगदान आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी रान पेटवणाऱ्या शिक्षक संघटना एका जागतिक दर्जाच्या शिक्षकाच्या पाठीशी उभ्या राहण्यास का मागे राहिल्या हे न उलगडणारे कोडे आहे.
रणजीतसिंह डिसले आणि दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या हातून घडत असलेल्या या महान कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या छोट्या छोट्या माफ करण्याजोग्या चुका शोधून त्या चुका किती मोठ्या आणि गंभीर आहेत हेच जगापुढे मांडण्याचे प्रकार या यंत्रणेने केले. वारे गुरुजी आणि रणजितसिंह डिसले गुरुजी हे आपल्या हातून काहीतरी भव्य दिव्य महान कार्य घडवण्यात व्यस्त होते. त्याच वेळेला झारीतील शुक्राचार्य त्यांच्या हातून घडणाऱ्या छोट्या छोट्या चुकांवर लक्ष ठेवून त्यांचा घास घेण्यासाठी टपून बसले होते. योग्य वेळ येताच त्यांनी या दोन्ही शिक्षकांना खलनायक ठरवण्याचे काम करून दाखवले.
रणजीतसिंह डिसले गुरुजी काही दिवसातच फूलब्राइट शिष्यवृत्ती प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जातील. तत्पूर्वी त्यांचे 34 महिन्याच वेतन म्हणजे 17 लाख रुपये एवढी रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाणार आहे. ज्या काळातल्या कामासाठी अमेरिकेतील संस्थेने त्यांना ७ कोटी रुपयांचे बक्षीस दिले. त्याच काळातल्या कामाबद्दल महाराष्ट्रातलं शिक्षण क्षेत्र त्यांना 17 लाखाचा दंड करणार आहे. वाह रे व्यवस्था .. धन्य ते अधिकारी. सर्व शिक्षक संघटनांना माझं आवाहन आहे की अशा गुरुजींच्या पाठीशी राहण्याची देखील भूमिका संघटनांना घ्यावी लागेल. अन्यथा कोणीही गुरुजी शिक्षक असे जगावेगळे काम करण्याचे धाडस करणार नाही. कारण त्यांना मनामध्ये कायम भीती राहील की आपण मळलेल्या वाटेने न जाता नवीन वाट शोधण्याचा प्रयत्न केल्यास आपला डिसले किंवा वारे होऊ शकतो. असं घडत असताना आपल्या पाठीशी मात्र कोणीही नसेल. यातून शिक्षण क्षेत्राचे पर्यायाने महाराष्ट्राचं आणि या समाजाचे नुकसान होणार आहे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक होते. ते देशाचे राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. हे आम्ही सर्व शिक्षक मोठ्या अभिमानाने मिरवतो. परंतु अशाच या जागतिक दर्जाच्या दोन शिक्षकांचा या व्यवस्थेने बळी घेतला. परंतु त्यांच्यासाठी आम्ही काहीही करू शकलो नाही. याचे दुःखही आमच्या मनात एक शिक्षक म्हणून कायम राहील. म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकावतो आहे. बघा काही जमलं तर. दत्तात्रय वारे सर रणजितसिंह डिसले सर आम्ही तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही. आम्हाला माफ करा.