लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
अपयश ही यशाची गुरुकिल्ली आहे. अपार कष्ट करून यश हे नक्कीच मिळत असते. परंतु प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सिद्ध करून दाखवलंय गोंदे दुमाला येथील बाळू नाठे यांच्या कन्येने. गोंदे दुमाला येथील सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील कु. तृप्ती बाळू नाठे हिने इयत्ता दहावीत ९०.६० टक्के मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवल्याने तिचे कौतुक होत आहे. वडील बाळू भिकाजी नाठे, आई वनिता नाठे, मुख्याध्यापक तुषार पाटील, वर्गशिक्षक नरोडे, भोर यांच्या योग्य मोलाच्या मार्गदर्शनातुन प्रथम तृप्तीने बाजी मारली. लहानपणापासून तृप्ती हुशार असून वक्तृत्व स्पर्धा, गीत, चित्र काढणे आदी विषयात देखील पारंगत आहे. दहावीनंतर सायन्स विषयात प्रवेश घेऊन आयटी क्षेत्रात वाटचाल करणार असल्याचे तिचे वडील बाळू नाठे यांनी सांगितले. गोंदे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, माजी सरपंच गणपत जाधव, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे यांनी तृप्तीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तृप्तीने संपादन केलेले यश हे अभिमानाची गोष्ट आहे. तिने आमचे नाव रोशन केले आहे. भविष्यात आयटीचे शिक्षण पूर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. अधिकाधिक यश संपादन करून गोरगरिबांची तिच्या हातुन सेवा घडो. तिच्या पाठबळासाठी आम्ही आहोत.
- बाळू भिका नाठे, वडील