इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील युवतीच्या खून प्रकरणी तिच्या मेहुण्याचा कांगावा वेळीच ओळखल्यामुळे १५ ते २० कुटुंबातील युवकांचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचले आहे. घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी समयसूचकता आणि योग्य तपास केल्यामुळे मोठ्या संख्येने युवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न अधिकच वाढले असते. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या कार्यकुशलतेचे इगतपुरी तालुक्यात कौतुक केले जात आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निरपराध व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे. ह्याप्रमाणे काम करून माझे कर्तव्य योग्य पद्धतीने केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सांगितले.
अधरवड येथील कातकरी वस्तीत १५ ते २० जणांच्या टोळक्याने घुसून पहाटेच्या वेळी एका युवतीची हत्या आणि ३ घरांना आग लावली. असा बनाव शरद वाघ याने करून तशी फिर्याद घोटी पोलिसांत दिली होती. घटनेच्या आदल्या दिवशी बारशिंगवे येथील ३० ते ४० जण वस्तीत आले होते याचा पुरेपूर फायदा घेऊन शरद वाघ याने पोलिसांना चकवा दिला होता. मात्र घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांना या घटनेमध्ये कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी अधिक तपास करुन युवतीचा खून शरद वाघ यानेच केल्याचे निष्पन्न केले. श्री. खेडकर हे अतिशय कार्यकुशल पोलीस अधिकारी असून ह्या घटनेच्या प्राथमिक चौकशीमध्ये बारशिंगवे येथील १५ ते २० कुटुंबातील युवकांवर संशयित म्हणून फौजदारी गुन्हा दाखल होणार होता. मात्र आधीच पुरेपूर तपास झाल्याने सत्यता उघड झाली. परिणामी यामध्ये अनेक युवक नाहक भरडले जाण्यापासून वाचले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या तत्परतेमुळे युवकांवर नाहक होणारा अन्याय, निर्माण होणारे विविध सामाजिक प्रश्न आणि त्याचा त्रास वाचला आहे. योग्य तपास, वेगवान यंत्रणा आणि खरा गुन्हेगार शोधण्याची हातोटी वापरून दिलीप खेडकर यांनी केलेल्या कामांचे इगतपुरी तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.