शाळा बंद करणाऱ्या इगतपुरीच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
इगतपुरीनामा न्यूज, दि. 11
इगतपुरी तालुक्यातील धरणग्रस्त गाव असणाऱ्या दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची शाळा तात्काळ पुन्हा सुरु करण्याचा आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी दिला आहे. 43 विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवणारे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख माधव उगले यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन आंदोलकांना देण्यात आले आहे. शाळा सुरु होणार असल्याचे समजताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. इगतपुरी तालुक्याच्या शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर सुंदोपसुंदी आणि वर्चस्ववाद मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अंगलट येणारा निर्णय आणि अनेक वादग्रस्त घटना कायमच घडत असतात. विद्यार्थी आणि शिक्षक हिताचे निर्णय घेतांना कोणतेही संतुलन साधले जात नसून वादाची निर्मिती होत असते. परिणामी याचा फटका शिक्षणाला बसतो अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी दिली. शिक्षण विभागाच्या तालुक्याच्या कुटुंबप्रमुखांना सद्बुद्दी मिळो असेही ते म्हणाले आहेत.
एक महिन्यापासून शाळा बंद असल्याने दरेवाडी येथील 43 विद्यार्थी आपले दप्तर घेऊन नाशिक जिल्हा परिषदेवर धडकले. आमची दप्तरे घ्या आणि आम्हाला वळायला शेळ्या द्या, शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई करा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्या दालनात याबाबत बैठक झाली. दरेवाडी शाळा तातडीने सुरु करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित ठेवणारे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, विस्ताराधिकारी कैलास सांगळे, केंद्रप्रमुख माधव उगले यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. संबंधित व्यक्तींवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात येईल असेही आश्वासन यावेळी देण्यात आले. बैठकीवेळी सीताराम गांवडा यांच्या नेतृत्वाखाली गणपत गावंडा, साईनाथ गावंडा, सोमनाथ आगिवले, बाळू गावंडे, काळू गांवडा, लक्ष्मण गावंडे, लहू गावंडे, कृष्णा गावंडे, आनंद आगीवले, राजेंद्र मेंगाळ, गोविंद गावंडे, यशोदाबाई गावंडे, नथु सावंत, मथुरा भगत उपस्थित होते. यापुढे इगतपुरी तालुक्याच्या शिक्षण विभागाने आपल्या कारभारात सुधारणा करून सुयोग्य निर्णय घ्यावेत असे मत भगवान मधे यांनी मांडले.