“मु. पो. मोडाळे” ह्या नव्या ओळखीने मोडाळे गावात स्वतंत्र टपाल कार्यालय कार्यान्वित होणार : गोरख बोडके यांच्या अखंडित प्रयत्नांनी ग्रामस्थांना मिळणार पोस्टाच्या सुविधा

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

अतिदुर्गम गाव, सभोवताली डोंगर दऱ्या, साधनांचा अभाव आणि जगाची कोणतीही खबर नसलेले गाव म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गाव प्रसिद्ध होते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. आता नाशिक जिल्ह्यातील टॉप आणि वेगाने विकसित असणारे गाव म्हणून मोडाळे गावाची ओळख निर्माण झालेली आहे. आता शैक्षणिक पदव्या आणि उच्च शिक्षणामुळे युवकांना नोकऱ्यांच्या संधी पोस्टाच्या सेवेद्वारे मिळणे आवश्यक असतांना ब्रिटिश काळातील सांजेगाव पोस्टाच्या संपर्कात राहावे लागत होते. आता जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या अविरत प्रयत्नांनी मोडाळे गावात स्वतंत्र पोस्ट कार्यालय कार्यान्वित होणार आहे. मु. मोडाळे, पो. सांजेगाव याऐवजी आता मु. पो. मोडाळे अशी नवी आणि दिमाखदार ओळख निर्माण होणार आहे. यासह ग्रामस्थांना पोस्टाच्या विविध योजना, बँकिंग याचा लाभ होणार आहे.

मोडाळे गावात स्वतंत्र पोस्ट निर्मित करावे म्हणून जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी विविध पातळ्यांवर यशस्वी पाठपुरावा केला. अत्यंत अवघड असणारी ही बाब त्यांनी पूर्ण करून घेतली. इगतपुरी तालुक्यात अनेक वर्षानंतर स्वतंत्र पोस्ट कार्यालय मिळणारे मोडाळे हे पहिलेच गाव आहे. कार्यालय सुरू होत असलेल्या आदेशाची प्रत आज अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याप्रसंगी नाशिक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव, आयपीबीबीचे शाखा व्यवस्थापक श्री. दुबे, तक्रार निरीक्षक एम. आर. देवरे, उपविभागीय निरीक्षक पी. एस. सूर्यवंशी यांनी गोरख बोडके, ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या हातात आदेशाची प्रत दिली. यावेळी सर्वांनी टपाल विभागाचे आभार मानले. नवी ओळख मिळणार असल्याने युवकांनी जल्लोष केला.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!