५० प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला वाडीवऱ्हे फाट्यावर अपघात : बसचालकाला झोप लागल्याने झाला अपघात ; सुदैवाने जीवितहानी नाही

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

मुंबईकडून नाशिकच्या दिशेने किमान ५० प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला वाडीवऱ्हे फाट्यावर आज पहाटे साडेपाच वाजता अपघात झाला. लक्झरी बसच्या चालकाला अचानक झोप लागल्याने हा अपघात झाला आहे. भरधाव वेगामध्ये ही बस थेट वाडीवऱ्हे फाट्यावर असलेल्या पोलीस चौकीवर धडकली. ह्याच ठिकाणी दिवसभर प्रवासी मोठ्या संख्येने असतात. पहाटे अपघात झाल्यामुळे मोठे विघ्न टळले. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना किरकोळ मार लागला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. ५० प्रवाश्यांचे दैव बलवत्तर असल्याने सर्वजण बचावले. प्रवाश्यांनी मिळेल त्या वाहनाने नाशिक गाठले. बसचा चालक आणि क्लिन्नर पसार झाले आहेत.

मुंबई आग्रा महामार्गावर रोजच होणाऱ्या अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून ह्याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच आज पहाटे नर्मदा ट्रॅव्हलच्या MH 04 GP 9979 ह्या क्रमांकाच्या लक्झरी बसचालकाला झोप लागल्याने बस अपघातग्रस्त झाली. ह्या बसमध्ये किमान ५० जण प्रवास करत होते. ह्या सर्वांचा जीव बचावला आहे. बेजबाबदार बसचालक आणि क्लिन्नर यांनी हा अपघात होताच पलायन केले. वाडीवऱ्हे पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!