गोंदेजवळ मोटारसायकल टॅंकरला धडकली ; २ युवक, १ युवती गंभीर जखमी : बेशिस्त वाहनधारक आणि दुचाकीवाल्यांवर कायद्याचा बडगा उगारण्याची गरज

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

सातत्याने होणारे अपघात कमी होण्याऐवजी वाढतच असून आता पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारक आणि दुचाकीवाल्यांवर कायद्याचा बडगा उगारण्याची गरज आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील इंटरमोड कंपनीजवळ आज सकाळी साडेअकरा वाजता ट्रीपल सीट मोटारसायकल टँकरला जाऊन धडकल्याने अपघात झाला. यामध्ये २ युवक आणि १ युवती गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केल्यानंतर वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींना दाखल करण्यात आले आहे.

MH 15 HP 8625 ह्या मोटारसायकलवरून गौरव मच्छिंद्र घुगे, रोहित सुनील पळे हे युवक आणि १ युवती ( नाव माहीत नाही ) सर्व राहणार द्वारका नाशिक हे तिघे प्रवास करीत होते. भरधाव वेगाने चालत असताना समोरच्या टँकरला मोटारसायकल धडकल्याने अपघात झाला. ह्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

सुरक्षित प्रवास, सुरक्षित रस्ता ठेवण्याची जबाबदारी शासन, पोलिसांसह वाहनचालकांची देखील आहे. दुर्दैवाने हे घटक आपली जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत. याचा परिपाक म्हणून जीवघेण्या अपघातांची मालिका सहजतेने कमी होताना दिसत नाही. दोन वाहनांचा अपघात होणे ही वेगळी बाब आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, रस्ता ओलांडत असलेल्या, रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींना भरधाव वाहनांनी धडक देणे आणि त्यात त्या व्यक्तीचा हकनाक जीव जाणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.
- ॲड. सुनील कोरडे, इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!