इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड हे एक सेवाभावी व समाजाभिमुख लोकोपकारी उपक्रम करणारे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन, जलपुनर्भरण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर यासह गरजूंना शालेय साहित्य, साक्षरता चालवणे, विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन असे अनेक उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवले जातात. आज पद्मश्री तथा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रतिष्ठानकडून स्वच्छता अभियान संपन्न झाले. नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
आह सकाळी ७ वाजता सुरू झालेले अभियान १० वाजेपर्यंत शिस्तबद्ध पूर्ण झाले. यात प्रतिष्ठानच्या १७५ सदस्यांनी सहभाग नोंदवला. २१ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली कार्यालये, पोलीस स्टेशन घोटी, बस स्थानक घोटी, ग्रामीण रुग्णालय घोटी, जनता विद्यालय परिसर घोटी, 2 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून १३ टन कचरा जमा केला. याकामी ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. ह्या उपक्रमाला संबंधित कार्यालयातील शासकीय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपालिका सदस्य, विविध पदावर असलेले मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी प्रतिष्ठानचे कार्य अत्यंत स्तुत्य व अनुकरणीय आहे असे सांगून प्रतिष्ठानला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.