खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यातील अनेक युवक सध्या वैफल्यग्रस्त अवस्थेतून आत्महत्येचा चुकीचा मार्ग पत्करत आहेत. अत्यंत किरकोळ कारणांनी युवकांकडून आपले अमूल्य जीवन संपुष्टात आणले जात आहे. ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती पाहून हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक रुपेश हरिश्चंद्र नाठे व्यथित झाले आहेत. आपल्या रक्ताने इतिहास लिहून हिंदवी स्वराज्य घडवणाऱ्या शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या महाराष्ट्रात युवकांवर आत्महत्या करण्याची केविलवाणी वेळ आलेली आहे. शिवराय, राजे संभाजी यांनी उभे केलेले स्वराज्य आणि आईवडिलांनी सोसलेले कष्ट याचा विचार तरुणांकडून केला जात नाही. म्हणून युवकांचे प्रभावी प्रबोधन करून त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हिंदवी स्वराज्य ग्रुप सरसावला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी दिली. त्यानुसार १४ मे पासून संभाजी महाराज जयंतीच्या पर्वावर “युवा संवाद” कार्यक्रमाद्वारे इगतपुरी तालुक्यातील गावागावांत तरुणांशी संवाद साधला जाणार आहे. नाशिक येथे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील अनेक तरुण नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. बाल्यावस्थेपासून युवा अवस्थेपर्यंत आईवडिलांनी केलेला सांभाळ आणि संस्कारांचा विसर त्यांना पडला आहे. सर्वांच्या स्वप्नांचा चुराडा करून संपूर्ण कुटुंब उध्वस्त होण्यासाठी युवकांची आत्महत्या कारणीभूत ठरत आहे. हे दुष्टचक्र रोखवण्यासाठी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. युवकांच्या समस्या ऐकून त्यावर परिणामकारक उत्तर देऊन संवाद साधला जाणार आहे. शेकडो तरुणांची जीवनयात्रा वाचवण्यासाठी ह्या संवाद यात्रेचा फायदा होणार आहे. १४ मे ह्या दिवसापासून संभाजी महाराज जयंतीच्या पर्वावर “युवा संवाद” कार्यक्रमाद्वारे इगतपुरी तालुक्यातील गावागावांत तरुणांशी संवाद साधला जाईल. याबाबत रुपेश हरिश्चंद्र नाठे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, छत्रपतींच्या पावन भुमीत आपण जन्म घेतला आहे. अनेक मावळ्यांनी व स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या रक्ताने इतिहास लिहिला. ह्या पुण्यभुमीत जन्माला येवुनही आत्महत्येचा चुकीचा मार्ग पत्करणे योग्य नाही. जीवन संपवण्याचा विचार ज्या दिवशी येईल त्या दिवशी स्वतःसाठी जगणे सोडून समाजासाठी जगायला सुरवात करा. आमच्याशी बेधडक बोला आम्ही आपल्यासाठी निश्चितच चांगला पर्याय देऊ. प्रत्येक समस्येवर निश्चितच मार्ग आहे. तुम्ही फक्त धीर सोडु नका. “युवा संवाद” यात्रेत युवकांचे प्रबोधन होणार आहे. खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते संवाद यात्रेच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे रुपेश हरिश्चंद्र नाठे आणि सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करून चांगल्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.